स्टॅव्हेंगर (नॉर्वे) – भारताचा महान ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी घोडदौड अखेर शनिवारी संपुष्टात आली. या स्पर्धेच्या क्लासिकल गटातील चौथ्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोविरुद्ध त्याला पराभव पत्करावा लागला. मात्र, मॅग्नस कार्लसनसह तो प्रत्येकी 8.5 गुणांसह आघाडीवर आहे.
आनंद आणि सो यांच्यातील नियमित खेळ 28 चालींमध्ये बरोबरीत संपला. त्यानंतर आर्मागेडन पद्धतीने झालेल्या सामन्यात आनंदला 46 चालींमध्ये पराभव पत्कारावा लागला. भारतीय खेळाडूने पहिल्या तीन फेरीत फ्रान्सच्या वाशिर लॅग्रेव्ह, बल्गेरियाच्या वासीली टोपालोव्ह आणि चीनच्या वॅंग हू यांच्यावर विजय मिळवला होता.