स्टॉकहोम : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपली अण्वस्त्रे वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. 2022 या वर्षामध्ये दोन्ही देशांनी नवीन प्रकारची अण्वस्त्रे विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यात भारत लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे निरीक्षण स्वीडनमधील एका आंतरराष्ट्रीय निरीक्षक गटाच्या अहवालामध्ये नोंदववण्यात आले असल्याचे “स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने म्हटले आहे.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांकडून असलेला धोका वाढल्यामुळेच भारताने ही लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या संस्थेच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
भारताकडून अण्वस्त्र उत्पादनामागील उद्दिष्टाचा मुख्य केंद्रबिंदू पाकिस्तान हाच आहे. तर भारताने आता लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर विशेष भर दिला असून चीनपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे भारत विकसित करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारत, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल या अण्वस्त्रसज्ज असलेल्या 9 देशांकडून आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण केले जाते आहे. यातील काही देशांनी आत्याधुनिक अण्वस्त्रे तैनात केली आहे.
जगभरात 12,512 अण्वस्त्रे…
जगभरात 2023 या वर्षात 12,512 अण्वस्त्रे तैनात असल्याची माहिती उपलब्ध आहे. यापैकी 9,576 अण्वस्त्रे संभाव्य सज्जतेचा भाग म्हणून लष्करी ताब्यात आहेत. जानेवारी 2022 मधील अण्वस्त्रांच्या संख्येत 86 ने नव्याने भर पडली आहे. यापैकी 3,844 अण्वस्त्रे क्षेपणास्त्रे आणि विमानांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. यातील 2000 अण्वस्त्रे रशिया आणि अमेरिकेच्या मालकीची आहेत. ही अण्वस्त्रे क्षेपणास्त्रे आणि लढावू विमानांमध्ये सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणत्याही क्षणी वापर करता येऊ शकतील, अशी या अण्वस्त्रांची सज्जता आहे.