कोपरगाव – कालवे जरी वाहू लागले असले, तरी कालव्यांचे वाहते पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत जाण्यासाठी पोटचाऱ्या व बंधारे भरून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, आगामी काळात तुमच्या शेतातील पिके हिरवी होत नाहीत, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे, असे आश्वासन माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिले.
निळवंडे कालव्यांच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील कालवे दुतर्फा भरून वाहू लागले आहेत. या क्षणाचे साक्षीदार होऊन लाभक्षेत्रातील भागात जलपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी साईनाथ रोहमारे, विश्वास महाले,अरुण येवले, रमेश घोडेराव, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, सर्जेराव औताडे, बापूसाहेब बारहाते, कैलास रहाणे, प्रकाश गोर्डे ,नानासाहेब गव्हाणे, बाळासाहेब गोर्डे, माधुरी डांगे, वैशाली साळुंखे, शरदनाना थोरात, विक्रम पाचोरे, रमेश आभाळे, बापूसाहेब औताडे, त्र्यंबक वर्पे, धनंजय वर्पे, विजय डांगे, दत्तात्रय गुंजाळ आदी उपस्थित होते.
या वेळी कोल्हे म्हणाल्या की, अनेक दशकांचा सुरू असलेला हा संघर्ष कोल्हे कुटुंबाला कधीच विसरता येणार नाही. कारण निळवंडेसाठी निर्मळ पिंपरी येथे आंदोलन होणार होते, त्या पूर्वी एक दिवस अगोदर बिपीन कोल्हेंवर शस्त्रक्रिया करायची होती. तरीही तो दिवस टाळून निळवंडे लाभक्षेत्रासाठी होणाऱ्या आंदोलनात ते आग्रहाने सहभागी झाले व त्यानंतरच त्यांनी उपचार घेतले. अशा भावनिक नाळ असलेला प्रश्न सोडवण्यासाठी मी आवश्यक तिथे संघर्ष व पाठपुरावा केला. त्यामुळे माझे भावनिक नाते निळवंडेच्या पाण्याशी आहे.
विधानसभेत नागपूर अधिवेशनादरम्यान पायऱ्यांवर बसून स्वसरकारविरोधात आंदोलन केले व निळवंडे धरणासाठी जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी सरकारदरबारी भांडत राहिले. कारण स्व. कोल्हेंनी लाभक्षेत्रातील गावांच्या समावेशासाठी केलेली आंदोलने आणि पाठपुरावा हा माझी प्रेरणा ठरला. कोणत्याही श्रेयवादात न अडकता प्रश्न सुटल्याचे समाधान लाखमोलाचे आहे असे सांगून त्यांनी भाजप-शिवसेना सरकारचे आभार मानले. या वेळी विक्रम पाचोरे, कैलास रहाणे, नानासाहेब गव्हाणे, धनंजय वर्पे आदींनी मनोगत व्यक्त केले.
डोळ्यांच्या कडा पाणावल्या…
निळवंडे कालव्यांच्या जलपूजनप्रसंगी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी तो सत्कार माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेसमोर अर्पण केला. हा क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.