रिओ दी जानेरो :- भारताची ऑलिम्पिकपदक विजेती नेमबाज इलावेनिल वलारीवान हिने येथे सुरू असलेल्या रिओ नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे. तिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकताना 252.2 गुण मिळवले.
फ्रान्सच्या ओशेन मुल्लर 251.9 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली व तिला रजत पदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या झेंग झियाल हिने तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉंझपदक पटकावले. इलावेनिलने 630.5 गुणांसह आठव्या स्थानावर असूनही अफलातून कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.मुल्लरने पात्रता फेरीत 633.7 गुण कमावताना अव्वल स्थान मिळवले होते. मात्र, तरीही तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताचा नेमबाज संदीपसिंग 628.2 गुण मिळवताना पात्रता फेरीत 14 व्या स्थानावर राहिला. इलावेनिलने संदीपसह 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात 629.91 असे गुण नोंदवले होते, तरीही त्यांना या गटात ब्रॉंझपदक मिळवण्यात अपयश आले होते.