पुणे – चैतन्य आणि मांगल्याने भारलेला सर्वांचा प्रिय असा गणेशोत्सव दि. 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. तर, घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघे पुणे शहर सजले आहे. पुण्यातील मानाच्या आणि महत्त्वाच्या गणेशमंडळांची जगभर ख्याती आहे.
त्यामुळे हा वैभवशाली सोहळा “याचि डोळा’ पाहण्यासाठी देश-विदेशांतील भाविक पुण्यात येतात. परंपरेनुसार यंदाही या मंडळांनी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण केली आहे. सांस्कृतिक व धार्मिक मूल्यांची जोपासना करत उत्सव साजरा केला जात आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : सकाळी 11.50 वा.
“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या श्रींची प्रतिष्ठापना तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी करण्यात येणार आहे. “ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली. परंपरेप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीने या गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.
“ओमकार’ महालात श्री गणराय विराजमान होणार आहेत. तर, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा यापुढेही तशीच सुरू राहिली पाहिजे. याच भावनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असेही बालन यांनी सांगितले.
मानाचा पहिला : श्री कसबा गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : सकाळी 11.37 वाजता
गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना मंगळवारी सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते “श्रीं’ ची प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता श्रींना घेण्यासाठी मिरवणूक निघणार आहे. उत्सवमंडपातून ही मिरवणूक फडके हौद, देवाजी बाबा चौक, दारुवाला पूल, अपोलो थिएटर चौक, रास्तापेठ पॉवर हाऊस येथे मूर्तीकार अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूमध्ये जाईल.
तेथून श्रींची मूर्ती पालखीत विराजमान होऊन ती मिरवणूक अपोलो थिएटर चौक, दारुवाला पूल, देवाजी बाबा चौक, फडके हौदमार्गे पुन्हा उत्सव मंडपात येईल. त्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात येईल. मिरवणुकीत प्रभात बॅंड, संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम ढोल ताशा पथक, शौर्य ढोल ताशा पथक सहभागी होतील.
मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : सकाळी 11.50 वाजता
गणरायाची प्रतिष्ठापना मंगळवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी करण्यात येणार आहे. श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज सज्जनगड येथील श्री भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्रींचा आगमन सोहळा पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार असून,
आगमनाची मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथील गळुंजकर यांच्या घरापासून चांदीच्या पालखीतून निघेल.
तेथून ती कुंटे चौक, नगरकर तालीम पुढे आप्पा बळवंत चौकमार्गे उत्सव मंडपात येईल. मिरवणुकीत आढाव बंधू यांचे नगारावादन, न्यूगंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा ढोलताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक सहभागी होतील.
मानाचा तिसरा : श्री गुरुजी तालीम मंडळ गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : दुपारी 1.45 वाजता
मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना युवा उद्योजक तथा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन, जान्हवी बालन-धारीवाल यांच्या हस्ते दुपारी 01 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता श्रींच्या आगमनाची मिरवणूक उत्सव मंडपातून सुरू होईल.
यासाठी स्वप्नील आणि सुभाष सरपाले यांनी फुलांचा रथ बनवला असून, त्यातून श्रींची मिरवणूक काढली जाणार आहे. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौकमार्गे जोगेश्वरी चौक, पुढे बुधवार चौक पुढे बेलबाग चौकमार्गे पुन्हा गणपती मंडपात येईल.
या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, गंधर्व ब्रास बॅंड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, शिवप्रताप ढोल ताशा पथक, अभेद्य ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे.
मानाचा चौथा : श्री तुळशीबाग गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : सकाळी 11.30 वाजता.
मंडळातर्फे यंदा उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता उत्सवमूर्ती मंडपात आणली जाणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते आणि नीलेश गायकवाड, ललित जैन, मनोज छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11.30 वाजता ती प्रतिष्ठापित होईल.
यंदा प्रथमच पेशवेकालीन श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून पूजेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत एक बॅंडपथक आणि एक ढोल ताशा पथक आणि नगारावादन असणार आहे. ही मिरवणूक तुळशीबाग राममंदिर येथून बाबू गेनू चौक, मंडई, शनिपार रस्ता, बाजीराव रस्त्याने नगरकर तालीम चौक, लक्ष्मीरस्त्याने गणपती चौकातून उत्सव मंडपात येईल.
तेथे श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. पूना मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया सपत्नीक, तसेच जयराज अँन्ड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते तसेच तुळशीबागेतील व्यापारी बांधव श्रींची पूजा होईल.
अखिल मंडई मंडळ : श्री शारदा-गजानन
प्रतिष्ठापना मुहूर्त : दुपारी 12.00 वाजता
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना ऍड. पराग आणि अनुराधा एरंडे यांच्या हस्ते केली मंगळवारी दुपारी 12 वाजता केली जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता श्रींची मिरवणूक निघणार असून,
ती अखिल मंडई मंडळ, अखिल मंडई मंडळ, मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे मंडई मंडळ उत्सव मंडपात येईल. या मिरवणुकीत समर्थ ढोल पथक, आवर्तन ढोल पथक सहभागी होणार आहे.
(पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती टिळक पंचांगानुसार याआधीच केसरीवाड्यात आणला आहे. त्यामुळे तो विसर्जनासाठीच बाहेर निघेल.)