नवी दिल्ली – करोना विषाणूमध्ये बदल होऊन तयार झालेल्या नव्या दोन स्ट्रेन्सपासून आपली लस संरक्षण देते, असा दावा मॉडर्ना या अमेरिकेतल्या औषध कंपनीने नुकताच केला होता. त्यानंतर आता भारत बायोटेक या भारतीय कंपनीनेही कोव्हॅक्सिन ही लस ब्रिटनमधील करोनाच्या नव्या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेन वुहानमध्ये गेल्या वर्षी आढळलेल्या स्ट्रेनपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आणि मृत्यूला कारणीभूत ठरणारा आहे. करोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनवरवर कोव्हॅक्सिन ही लस प्रभावी ठरते आहे. असं भारत बायोटेक कंपनीने सांगितलं आहे. त्यासोबत कंपनीने आपलं संशोधनही प्रसिद्ध केलं आहे.
कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या 26 जणांच्या शरीरातून सेरा घेऊन त्यावर भारत बायोटेक कंपनीने प्लेक रिडक्शन न्यूट्रलायझेशन टेस्ट केली. कोरोनाच्या ब्रिटनमधल्या स्ट्रेनवर, तसंच अन्य एका स्ट्रेनवर त्याची चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीत ही लस दोन्ही स्ट्रेनवर प्रभावी ठरत असल्याचं आढळून आल्याचं म्हटलं आहे.
भारतासह डेन्मार्क, नेदरलॅंड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबॅनॉन, सिंगापूर आदी देशांमध्ये करोनाचा ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेन आढळला आहे. भारतात आतापर्यंत या स्ट्रेनचे 150 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारताने या स्ट्रेनचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आणि थांबवण्यासाठी वेगळं धोरण अवलंबलं आहे. 23 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ब्रिटनमधून येणारी सर्व विमानं बंद ठेवण्यात आली होती. तसंच ब्रिटनमधून आलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात होती.
कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सध्या सुरू आहेत. तसंच या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी ही लस वापरली जात आहे.