पुणे – शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कायमच ऐरणीवर असतो. यावरून महापालिका सभागृहात अनेकदा गदारोळही झाला आहे. कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आता नसबंदीच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून त्यानुसार आता महिन्याला चार हजार कुत्र्यांची नसबंदी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यासाठी नव्या दोन ठेकेदार संस्थांची नियुक्ती करण्यात येत आहे. पूर्वीच्या दोन आणि नवीन दोन अशा चार ठेकेदार संस्थांना महिन्याला प्रत्येकी एक हजार कुत्र्यांची नसबंदी करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सध्या, ऍनिमल प्रोटेक्शन क्लब, ब्ल्यू क्रॉस सोसायटी या दोन ठेकेदार संस्था नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम करतात.
हे काम मुंढवा आणि नायडू हॉस्पिटल परिसरातील “डॉग पॉंड’ येथे केले जाते. मात्र, शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण आणि कुत्र्यांचा प्रजनन वेग यात मोठी तफावत असल्याने भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळत नाही. पालिका हद्दीत नवीन 34 नवीन गावांचा समावेश होत असल्याने ही संख्या आणखी वाढणार आहे.
त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने आणखी दोन संस्थांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील युनिव्हर्सल ऍनिमल वेलफेअर बोर्ड (बीड) या संस्थेला काम देण्यात आले असून, जेनिस ऍनिमल वेलफेअर ट्रस्ट (पाचगणी) या संस्थेला काम देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करणे, श्वान पथकाचे वाहन उपलब्ध करणे, त्यांची नसबंदी आणि अँटीरेबीज लसीकरण करणे, त्यांना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि त्यानंतर त्यांना पुन्हा सोडणे ही कामे संबंधित संस्था करणार आहेत.
प्रत्येक संस्थेला एका महिन्याला एक हजार कुत्र्यांची नसबंदी करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यामुळे महिन्याला 4 हजार कुत्र्यांवर नसबंदी होईल. संबंधित संस्थांना एका कुत्र्यामागे 1600 रुपये दिले जाणार आहे. चार संस्थांच्या 14 ते पंधरा गाड्या कुत्री पकडण्याचे काम करणार आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एक गाडी ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात आतापर्यंत 20 हजार कुत्र्यांची नसबंदी पालिकेकडून करण्यात आली आहे.
– डॉ. पी. एन. वाघ, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका