इंडियन पॉलिटिकल लीग (अग्रलेख)

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या आशीर्वादाने सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा रंगात आली असतानाच जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत देशातील दुसरी आयपीएल म्हणजेच इंडियन पॉलिटिकल लीगही जोशात आली आहे. ही दुसरी आयपीएल पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगू लागली आहे. उद्या मंगळवारी या पॉलिटिकल लीगचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. तर क्रिकेट लीग आता शेवटच्या टप्प्यात आली आहे.

भारतात क्रिकेट हाच लोकांचा धर्म असला तरी यावेळी मात्र इंडियन पॉलिटिकल लीगने क्रिकेट लीगवर मात केली आहे. गेली 10 वर्षे सुरू असलेल्या क्रिकेट लीगमध्ये संघर्ष आणि ईर्ष्या आहेच. क्‍वचित वादविवाद आणि मॅच फिक्‍सिंगचे ग्रहण या स्पर्धेला लागले आणि काही खेळाडूंवर कारवाई झाली. यावर्षीही गोलंदाज अश्‍विन याने मंकडिंग पद्धतीचा वापर करून प्रतिस्पर्धी खेळाडूला धावबाद केल्याने वाद निर्माण झाला होता. पण हे वाद फार काळ टिकत नाहीत आणि खेळ चालू राहतो. या पार्श्‍वभूमीवर इंडियन पॉलिटिकल लीगमधील वाद आणि संघर्ष यांनी टोक गाठले आहे असेच म्हणावे लागते. ही लोकसभा निवडणूक जणू काही शेवटची आहे अशा प्रकारे संघर्ष आणि ईर्ष्या यांचे प्रदर्शन केले जात आहे. सत्ताधारी भाजपला सत्ता राखायची आहे आणि कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्ष भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत. पण सत्ताधारी असो किंवा विरोधक त्यांनी यावेळी प्रचाराची सर्वात खालची पातळी गाठल्याचेच आतापर्यंतच्या प्रचारावरून लक्षात येत आहे.

अजून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अर्धा भागही पूर्ण झाला नाही तोच इतक्‍या गलिच्छ पातळींवर प्रचार केला जात आहे की निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत ही पातळी आणखी किती खाली जाईल याची कल्पनाच करायला नको. युद्धनीतीतील साम, दंड आणि भेद या सर्वच पर्यायांचा वापर आता इंडियन पॉलिटिकल लीगमध्ये खुलेपणाने केला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीचे हे युद्ध जिंकायचे या भावनेने मैदानात उतरलेल्या राजकीय पक्षांना साधनशुचिता वगैरे शब्द माहीतच नसावेत. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने समोरच्या व्यक्‍तीला दुखावण्याचा एक कलमी कार्यक्रम पार पाडला जात आहे. समोरची व्यक्‍ती महिला असेल तर टीका करणाऱ्यांना जास्तच चेव चढतो हे आझम खान यांनी जया प्रदा यांच्यावर केलेल्या चुकीच्या टीकेवरून लक्षात येते. गेल्या काही दिवसांत निवडणुकीच्या या लीगमध्ये अनेक चुकीच्या आणि निषेधार्ह घटना घडल्या आहेत. आरोप करताना पातळी सोडली जात आहेच शिवाय मारामारी करण्यापर्यंत मजल गेली आहे.

भाजपच्या प्रवक्‍त्याच्या अंगावर फेकलेला बूट असो किंवा पाटीदार नेता हार्दिक पटेल यांना भर व्यासपीठावर झालेली मारहाण ही त्याची उदाहरणे मानावी लागतील. बूट फेकण्यामागे किंवा मारहाण करण्यामागे काहीतरी कारण होतेच. पण ऐन निवडणुकीच्या मोसमात या घटना घडतात तेव्हा त्याला राजकारणाचा वास आल्याशिवाय राहात नाही. ऐन निवडणुकीतच अशा काही गोष्टी बाहेर काढल्या जात आहेत की त्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे समजेपर्यंत निवडणुकीचा कालावधी संपू शकतो. केवळ संभ्रम निर्माण करून मतदारांच्या मनात शंका उत्पन्न करणे हाच त्याचा उद्देश आहे. एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता जे काही बोलतो किंवा करतो ते विधान आणि कृत्य अंगाशी येऊ लागले की राजकीय पक्ष ते त्याचे वैयक्‍तिक मत होते, असे म्हणून पळवाट काढतात. पण अनेकवेळा राजकीय पक्ष आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठीच अशा घटना किंवा विधाने घडवून आणतात की, काय अशी शंका घेण्यासही वाव आहे.

भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले धाडसी आणि प्रामाणिक अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त आणि अत्यंत चुकीच्या विधानावरून ही गोष्ट समोर येते. हे विधान साध्वीचे वैयक्‍तिक मत होते, असे म्हणून जबाबदारी झटकणाऱ्या भाजपचे नेते सध्या पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे आणि त्यानंतर केलेल्या हवाई कारवाईचे भांडवल करूनच मते मागत आहेत हा विरोधाभास लक्षात घ्यायला हवा. भाजपच्या कोणत्याही जबाबदार नेत्यांनी या विधानाचा अद्याप निषेध केलेला नाही याचा अर्थ काय समजायचा? युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते या चालीवर आता राजकारणातही सारे क्षम्य असते, असे म्हणण्यासारखी ही स्थिती आहे.

क्रिकेटच्या लीगने लोकांचे मनोरंजन होत असेल तर पॉलिटिकल लीगने मात्र लोकांचा मनस्ताप वाढत आहे. लोकशाहीचे सारे संकेत झुगारून निवडणूक लढली जात असेन तर त्याची जाणीव आता सामान्य नागरिकालाही होत आहे हे सोशल मीडियावरील विविध संदेशावरून लक्षात यायला हरकत नाही. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याची क्षमता मतदाराकडे असते म्हणूनच त्याचा कौल नेहमी वेगळा असतो, हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवे. निवडणुकीच्या ऐन काळात राज ठाकरे यांच्या प्रचारसभेला परवानगी नाकारणे किंवा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा विषय उपस्थित करणे याचा अर्थही आता सामान्य नागरिकांना कळू लागला आहे. दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या आयपीएलमध्ये चांगली लढत देऊनही पराभूत झालेल्या संघाचेही मनापासून अभिनंदन केले जाते.

पण लोकशाही निवडणुकीतील पॉलिटिकल लीगमध्ये चुकीच्या पद्धती वापरून विजयी झालेल्यांच्या नशिबी निश्‍चितच टाळ्या नसतील हे लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या निवडणुकीच्या निमित्ताने इंडियन पॉलिटिकल लीगमध्ये जे काही चालू आहे ते लोकशाही भारताला अपेक्षित नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या या चुकीच्या लीगला मतदारांनी गांभीर्याने घेतले तर काहीही होऊ शकते. स्वच्छ कारभार आणि प्रशासनाची हमी आपल्या जाहीरनाम्यात देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनीच आता हे इंडियन पॉलिटिकल लीग स्पर्धात्मक भावनेने खेळले जाईल याची दक्षता घ्यायला हवी. कोणत्याच पक्षाने चुकीच्या गोष्टीचे समर्थन न करता भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेली निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात आणि निरोगी स्पर्धेच्या पद्धतीने लढवली तरच आपली लोकशाही बळकट होईल आणि इंडियन पॉलिटिकल लीग अधिक
रंजक होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.