नगर तालुक्‍यात जगताप-विखे यांच्यात काटे की टक्‍कर

नगर: भाजप सेना युतीमुळे तालुक्‍यात भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखेंना आघाडी मिळेल असे वातापरण असताना भाजपा-सेनेमध्ये मतभेद निर्माण झाल्याने , शिवाजीराव कर्डिले यांचे समर्थकांना विश्‍वासात न घेतल्याने कर्डिले यांच्या सैनिकांनी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या घडाळाचे उघडपणे काम सुरू केल्यामुळे घडाळाचे काटे वेगाने फिरू लागले आहेत, त्यामुळे विखेंच्या गटात खळबळ उडाली आहे.

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यात मताधिक्‍य वाढविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. कागदावर सर्वात मोठी असणारी भाजप-सेना महायुती, भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले प्रचंड मतभेद व मनभेद, एकमेकांविषयी असलेले संशयाचे वातावरण यामुळे पोकळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्याने उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासमोरच केलेली टिका-टिपणी, युती असुनही एकत्र मेळावे न घेता वेगवेगळे मेळावे घ्यावे लागले. त्या मेळाव्यामध्येही भाजप-सेना पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर जहरी भाषेत केलेली टिका व दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदा यामुळे युती भक्‍कम न होता, दुबळी बनत गेली.

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले लोकप्रतिनिधी असले तरी त्यांची नगर तालुक्‍यावर मजबूत पकड आहे. तालुक्‍यातील बहुतेक ग्रामपंचायत, सेवा सोसायट्या, खरेदी विक्री संघ, नगर बाजार समितीसह संस्थांवर त्यांच्या समर्थकांची घट्‌ट पकड आहे. आमदार कर्डिले 1995 मध्ये नगर तालुका मतदार संघातून अपक्ष निवडून आले. त्यानंतर काही वर्षानंतर नगर-नेवासा मतदार संघाचे प्रतिनिनित्व केले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ते राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायती असो किंवा संस्था असो अनेक गावांमध्ये सत्ताधारी व विरोधकही त्यांनाच मानणारे आहेत.

नगर तालुक्‍यात भाजपबरोबर शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. तालुक्‍यातून शिवसेनेचे तीन नगरसेवक असून, नगर तालुका पंचायत समितीची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. काही ग्रामपंचायत व सेवा संस्थेवरही सेनेची सत्ता आहे. तालुक्‍यात कॉंग्रेसचे दोन गट असून एक राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा तर, दुसरा बाळासाहेब थोरात यांना मानणारा गट आहे. सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केल्यामुळे विखे गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ विखे गटात सामील झाले. तर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील शेळके यांनी आघाडीचा धर्म स्विकारत संग्राम जगताप यांना साथ देणे पसंत केलेले आहे.

राष्ट्रवादीचे नगर तालुक्‍यातर एकमेव जिल्हा परिषद सदस्य असणारे माधवराव लामखडेसह ठराविक ग्रामपंचातीवर राष्ट्रवादीची सत्ता असून नगर बाजार समितीवर भानुदास कोतकर, आमदार शिवाजीराव कर्डिलेसह आमदार अरूण जगताप यांची सत्ता आहे.

नगर तालुक्‍यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत तसेच नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना व भाजपा-राष्ट्रवादी अशी लढत तालुक्‍यात पाहावयास मिळाली. पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये सेना-कॉंग्रेस या महायुतीला अभूतपूर्व यश मिळून जिल्हा परिषदेमध्ये सेना 3 जागा तर, कॉंग्रेसला 2 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला एक जागा मिळाली, तर भाजपाला तालुक्‍यात एकही जागा मिळाली नाही. पंचायत समितीमध्ये शिवसेना-कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत महायुतीच्या ताब्यात पंचायत समिती आली. तर नगर बाजार समिती व खरेदी विक्री संघात भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवित सेना-कॉंग्रेसला पुरते नामोहरम केले. तेंव्हापासून सेना-भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला.

केंद्रात व राज्यात भाजप-सेना युती असताना नगर तालुक्‍यात मात्र या दोन पक्षात कडवा संघर्ष पहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रात व राज्यात युती होऊन भाजपने खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी न देता डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले. कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा मुलगा सुजय विखे यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणाले होते की, मी नगरमध्ये प्रचार करणार नाही. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनीही आपण पक्षाचा आदेश मानणार असून डॉ. सुजय विखेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी जावयासाठी नाही, तर पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे जाहीर केलेले आहे.

नगर तालुक्‍यात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचार सभा, रॅली होत असताना भाजपपेक्षा शिवसेनेचेच पदाधिकारी प्रचारात सक्रीय आहेत. आमदार कर्डिले समर्थकांना भाजपाचे उमेदवार सुजय विखेंची यंत्रणा साधे निरोप वा फोनही करीत नाहीत. कार्यक्रमाचे निमंत्रण नाही, नियोजनातही सहभागी करून घेत नसल्यामुळे आमदार कर्डिले समर्थक अस्वस्थ होऊन नेत्यांच्या आदेशाची वाट पाहत होते.

विखेंची यंत्रणा भाजपचा उमेदवार असताना भाजप पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेता शिवसेनेला अधिक जवळ करीत असल्याची खदखद निर्माण झाल्याने आमदार कर्डिलेंच्या आदेशाची वाट न पाहता सुरूवातीपासून शांत असणारे कर्डिले समर्थक सेना अचानक उघडपणे राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारात तन-मन-धनाने प्रत्यक्ष सक्रीय झाल्यामुळे घडाळाच्या काट्याला वेग आला असून आघाडीचे बळ वाढत असून, कमळाच्या पाकळ्या गळू लागल्याने विखेंच्या गटात खळबळ निर्माण झालेली आहे. खासदार दिलीप गांधींना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचे तालुक्‍यातील समर्थक नाराज आहेत. आमदार अरूण जगताप व खासदार गांधी यांची मैत्री जिल्ह्यात जगजाहीर असल्याने शेवटच्या क्षणी गांधी कोणती भूमिका घेतात व आपल्या कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देतात, याबाबत दबक्‍या आवाजात चर्चा सुरू आहे. नगर तालुक्‍यात जगताप-विखे यांच्यामध्ये काटे की टक्‍कर होणार हे स्पष्ट झालेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.