अभिनंदन यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानला इशारा दिला होता – मोदी

पाटण (गुजरात) – भारतीय हवाई दलाचे वैमनिक अभिनंदन वर्थमान यांची सुटका झाली नाही तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आपण पाकिस्तानल दिला होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पाटण इथल्या प्रचारसभेमध्ये सांगितले. जरी पंतप्रधानपदाची खुर्ची कायम राहिली किंवा नाही, तरी एकतर आपण जिवंत राहू किंवा दहशतवादी हे आपण ठरवले आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपले सरकार कटिबद्ध आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

सुरक्षेसाठी हालचाली…
कॉंग्रेसने 1985 पासून लष्कराला हॉवित्झर तोफा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. मात्र आपल्या सरकारने देशात तीन शस्त्रनिर्मिती कारखाने सुरू केले. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या गुजरातच्या सुरक्षेसाठी कॉंग्रेस सरकारने काहीही उपाय योजना केली नाही. मात्र आपल्या सरकारने दीसा येथे हवाई तळ सुरू केला. यामुळे गुजरातची सुरक्षा जपली जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आपली पुढची चाल ओळखू शकत नाहीत. मग पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अपली पुढची चाल कशी काय ओळखू शकतील असा शेराही पंतप्रधानांनी मारला. गुजरातमधील लोकसभेच्या 26 जागा जिंकण्यास भाजपला मदत करावे. जर असे झाले नाही तर पंतप्रधानांच्या राज्यामध्येच भाजपला कमी जागा मिळाल्याबाबत वृत्तवाहिन्यांवर चर्चा रंगतील, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

भारतीय वायुदलाने बालाकोटवर केलेल्या “एअरस्ट्राईक’नंतरच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यांना हुसकावण्याच्या प्रयत्नात हवाई दलाचा वैमानिक पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. त्याला पाकिस्तानने 1 मार्च रोजी सोडून दिले. मात्र जर त्याला पाकिस्तानने सोडले नाही, तर मोदी काय करू शकतात, हे पाकला जगाला सांगावे लागेल, असा इशारा आपण दिला होता, असेही मोदी म्हणाले.

मोदींनी 12 क्षेपणास्त्रे तयार ठेवली आहेत. जर परिस्थिती अधिक बिघडली तर हल्ला केला जाऊ शकतो, असे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्यच दिवशी पकिस्तानने भारतीय वैमानिकाच्या सुटकेची घोषणा केली होती. ही माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिली होती, मी काहीच केलेले नव्हते, असेही मोदींनी सांगितले.

पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर त्याला उत्तर देण्याची अपेक्षा देशवासीय करत होते. 26/11 नंतर जे मनमोहन सिंग यांनी केले, तेच मीही केले असते, तर देशवासियांनी मला माफ केले असते का ? असा प्रश्‍नही पंतप्रधानांनी विचारला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.