वॉशिंग्टन – अमेरिकेत भारतीय आयटी तज्ज्ञ व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या जबर मारहाणीमध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान विवेक तनेजा या ४१ वर्षीय आयटी तज्ज्ञ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या काही महिन्यात भारतीय व्यक्तीची हत्या होण्याची ही सातवी घटना आहे.
वॉशिंग्टन डीसीच्या व्हर्जिनिया उपनगरातील अलेक्झांड्रिया येथील रहिवासी विवेक तनेजा यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी १५ व्या स्ट्रीटच्या ११०० ब्लॉकमध्ये हल्ला झाला होता. हे ठिकाण व्हाइट हाऊसपासून अवघे सात ब्लॉक दूर आहे. ही घटना समजल्यानंतर रात्री २ वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोचले. तेंव्हा विवेक तनेजा यांना गंभीर दुखापत झाल्याचे आढळले होते.
त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले गेले होते. मात्र बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी विवेक तनेजा यांचे निधन झाले, असे वॉशिंग्टन डीसीच्या पोलिसांनी शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन जाहीर केले.
पोलिसांनी सीसीटिव्हीमध्ये दिसलेल्या एका संशयिताचे चित्र प्रसिद्ध केले असून या संशयिताबद्दल माहिती देणाऱ्याला २५ हजार डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे. आतापर्यंत या संदर्भात कोणालाही अटक केली गेलेली नाही.
संशयिताने विवेक तनेजाला जमिनीवर पाडले आणि त्याचे डोके फुटपाथवर मारले. मिडटाऊन सेंटर इमारतीतील शोत्तो आणि अकेदो या शेजारशेजारच्या जपानी रेस्टॉरंटमध्ये विवेक तनेजा यांचे अन्य एका व्यक्तीबरोबर भांडण झाले होते, असेही पोलीस म्हणाले. तनेजा हे डायनॅमो टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष होते, ही कंपनी फेडरल सरकारला तंत्रज्ञान उपाय आणि उत्पादन पुरवठादारांचे विश्लेषक होते.
त्यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये अनेक तांत्रिक सल्लागारी विषयक कंपन्यांचे नेतृत्व केले होते. या महिन्याच्या सुरुवातीला सईद मझहद अली या भारतीय युवकावरही असाच प्राणघातक हल्ला झाला होता. त्यापूर्वी श्रेयस रेड्डी, समीर कामथ, नील आचार्य, अकुल धारवान या भारतीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.