नवी दिल्ली – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या दस्तऐवज संग्रहात श्रीकृष्ण जन्मभूमी-इदगाह प्रकरणाबाबत महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. कनिंगहॅमने १८६२ ते १८६४ दरम्यान श्रीकृष्ण जन्मभूमी-इदगाहचे सर्वेक्षण केले होते. त्याच्या अहवालात त्याने असे लिहिले आहे की, औरंगजेबाने श्रीकृष्ण मंदिराचा वरचा भाग पाडला आणि भिंती शाबूत ठेवल्या, त्यावर घुमट बांधला आणि त्याला शाही ईदगाह मशीद म्हणून घोषित केले.
श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष आणि वकील महेंद्र प्रताप सिंग म्हणाले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पहिले संचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी १८६२ ते १८६ मध्ये देशभरातील अनेक ठिकाणांचे सर्वेक्षण केले होते. यात मथुरेच्या शाही मस्जिद इदगाहचाही समावेश होता. कटरा केशवदेवाच्या जमिनीवर बांधलेल्या मशिदीची लांबी १७२ फूट, रुंदी ६६ फूट आणि उंची २५ ते ३० फूट आहे.
श्री कृष्णाचे मंदिर ओरछा राजा वीरसिंग बुंदेला यांनी कटरा केशव देव जमिनीवर ठिपकेदार लाल/वाळूच्या दगडाने बांधले होते असे पुरावे दिले आहेत. तेच दगड मशिदीच्या भिंतीत सापडले. मंदिर पाडल्यानंतर त्याच दगडांनी घुमट बांधण्यात आला.
हे दगड मंदिराच्या बांधकामासाठी फतेहपूर सिक्री येथून आणले होते. सर्वेक्षणानंतर कनिंगहॅमने शाही मशीद इदगाहचा हाताने काढलेला नकाशाही बनवला, जो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या पुस्तकातही जतन केलेला आहे.