मुंबई: भारतीय हॉकी संघाने आगामी बर्मिंघम 2022 कॉमनवेल्थ गेम्समधून (Birmingham 2022) नाव मागे घेतलं आहे. कोरोनाचं संकट आणि विलगीकरण तसेच बायोबबलचे नियम या सर्वांमुळे हा निर्णय़ घेतला आहे.
ब्रिटनमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीला 10 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागतो. त्यामुळे भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघ ब्रिटनच्या बर्मिंघम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ खेळांमधून कोरोनासंबधी नियमांमुळे माघार घेत आहे.
यूरोप खंडात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव इंग्लंडमध्ये असल्याचे सांगत हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीत सध्या पहिलं लक्ष्य आशियाई खेळ असून तेच 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धाही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष्य देणंही महत्त्वाचं आहे.
दरम्यान कॉमनवेल्थ खेळ 2022 मध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहेत. तर चीनच्या हांग्जो येथे 10 सप्टेंबरपासून आशियाई खेळ खेळवले जाणार आहेत. या दोघांमध्ये अधिक कालावधी नसल्यानेही हा निर्णय हॉकी संघाने घेतला आहे.