शारजा – इशान किशनचे नाबाद अर्धशतक व कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर मुंबईने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या आहेत.
राजस्थानचा डाव 9 बाद 90 धावांवर रोखल्यानंतर मुंबईने आक्रमक फलंदाजी करत 9 व्या षटकातच 2 गडी गमावून 94 धावा करत विजय मिळवला. इशान किशन व रोहित यांनी पहिल्याच षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. रोहित जास्त आक्रमक होता. मात्र, एकदा जीवदान मिळाल्यावरही पुन्हा बेजबाबदार फटका मारून तो बाद झाला. त्याने आपल्या 22 धावांच्या खेळीत 13 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 2 षटकार फटकावले.
तो बाद झाल्यावर आलेल्या सूर्यकुमारने किशनला सुरेख साथ दिली. या जोडीने 6 व्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. सूर्यकुमार मात्र, स्थिरावल्यावर 13 धावांवर बाद झाला. त्याने 8 चेंडूत 3 चौकार फटकावले. तो बाद झाल्यावर हार्दिक पंड्याने किशनला साथ देत संघाचा विजय साकार केला. किशनने नाबाद 50 धावांच्या खेळीत 25 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांची बरसात केली. राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमान व चेतन सकारीया यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, जेम्स निशाम, नाथन कुल्टरनाइल आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने अत्यंत महत्वाच्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा डाव 9 बाद 90 असा रोखला.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कुल्टरनाइल व निशाम यांनी राजस्थानच्या प्रमुख फलंदाजांना अत्यंत स्वस्तात बाद केले. सलामीवीर इव्हान लेविसचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला मुंबईच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करता आला नाही. कर्णधार संजू सॅमसन यालाही खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहता आले नाही.
शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि डेव्हीड मिलर यांनाही साफ अपयश आले. दुसरीकडे मुंबईचे गोलंदाज भरात होते. त्यांनी राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स व श्रेयस गोपाल यांना एकही संधी दिली नाही. बुमराहने आपल्या स्लोअरवनवर राजस्थानच्या फलंदाजांना आक्रमक फटकेबाजी करण्यापासून रोखले. त्यातच अफलातून क्षेत्ररक्षण होत असल्याने राजस्थानला एकेरी व दुहेरी धावा काढणेही कठीण बनले होते.
राजस्थानच्या डावातील चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर जयस्वाल बाद झाला व त्यानंतर त्यांचा डाव सावरूच शकला नाही. तळातील फलंदाज मुस्तफिजूर रेहमानने थोडी चमक दाखवली अन्यथा त्यांना संघाच्या धावांची नव्वदीही गाठता आली नसती. मुंबईकडून नाथन कुल्टरनाइलने 4 गडी बाद केले. जेम्स निशामने 3 तर, जसप्रीत बुमराहने 2 गडी बाद केले.
या सामन्यात दोन्ही संघांनी बदल केले.
मुंबईने सलामीवीर फलंदाज क्वांटन डीकॉक आणि कृणाल पंड्या यांच्या जागी इशान किशन आणि जेम्स निशामला स्थान दिले. तर, राजस्थानने वेगवान गोलंदाज कुलदीप यादव आणि फिरकी गोलंदाज श्रेयस गोपालला संधी दिली. मुंबई इंडियन्सने आजवर झालेल्या लढतींत राजस्थान रॉयल्सविरुद्ध 13 सामने जिंकले आहेत तर राजस्थानने 12 सामने जिंकले आहेत.
गेल्या 7 सामन्यांपैकी राजस्थानने 5 वेळा मुंबईचा पराभव केला आहे. गेल्या मोसमात या दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमात झालेल्या सामन्यात मुंबईने सात गडी राखून विजय मिळवला होता.
धावफलक –
मुंबई इंडियन्स – 8.2 षटकांत 2 बाद 94 धावा. (रोहित शर्मा 22, सूर्यकूमार यादव 13, इशान किशन नाबाद 50, हार्दिक पंड्या नाबाद 5, मुस्तफिजूर रेहमान 1-32, चेतन सकारीया 1-36).
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 9 बाद 90 धावा. (इव्हान लेविस 24, डेव्हीड मिलर 15, यशस्वी जयस्वाल 12, राहुल तेवतिया 12, मुस्तफिजूर रेहमान नाबाद 8, नाथन कुल्टरनाइल 4-14, जेम्स निशाम 3-12, जसप्रीत बुमराह 2-14)