लंडन : फेरारी ही सर्वात वेगवान मोटर मानली जाते. पण याच फेरारीची जेव्हा चोरी झाली तेव्हा त्याचा तपास मात्र अत्यंत सावकाश झाला आणि एक चोरलेली फेरारी मोटार तब्बल तीस वर्षांनी सापडली. 1995 मध्ये एका फॉम्युला वन ड्रायव्हर कडून या फेरारी मोटरची चोरी झाली होती.
या चोरलेला मोटारीचा तपास करण्यात पोलिसांना तब्बल 30 वर्ष लागली. ऑस्ट्रेलियन फॉर्मुला वन ड्रायव्हर गेराल्ड बर्गर याची ही फेरारी मोटर होती. 1995 मध्ये त्या मोटारीची चोरी करण्यात आली होती. एप्रिल 1995 मध्ये सॅन मारीनो येथे रेस सुरू असताना दोन फेरारी मोटारची चोरी झाली होती. दीर्घकाळ या मोटारी पोलिसांनी तपास करूनही सापडल्या नव्हत्या. त्यापैकी एका मोटारीचा शोध लावण्यात मात्र पोलिसांना यश आले.
जानेवारी महिन्यामध्ये फेरारी कंपनीनेच पोलिसांना टीप दिली की, त्यांची चोरलेली एक फेरारी मोटार विकण्यात येणार आहे. इंग्लंडमधील एक दलाल अमेरिकेतल्या एका व्यक्तीला ही फेरारी मोटार विकणार असल्याची माहिती फेरारी कंपनीलाच मिळाली होती. मेट्रोपोलीटन पोलिसांनी त्वरित कारवाई करून हा व्यवहार हाणून पाडला आणि ती मोटार ताब्यात घेतली.
2023 मध्येच ही फेरारी मोटार जपानमधून इंग्लंडमध्ये आल्याचे लक्षात आले. या फेरारी मोटरची आत्ताची किंमत साडेतीन लाख पाऊंड आहे. चोरलेल्या दोन फेरारी मोटर पैकी एक फेरारी मोटर सापडल्यानंतर मेट्रोपोलीटन पोलिसांनी जगाच्या कानाकोपऱ्यातील पोलिसांशी संपर्क साधून ही मोटार कोठून चोरून आणण्यात आली आणि ती जपानमार्गे इंग्लंडमध्ये कशी पोहोचली? असा तपास आता सुरू केला आहे. पण याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.