धर्मशाला – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील गुरुवारी होणारा पहिला सामना संततधार पाऊस व निसरडे मैदान यांच्यामुळे रद्द झाला.
चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूच्या धोक्यामुळे आता लखनौ व कोलकाता येथे होणाऱ्या मालिकेतील उर्वरित दोन्ही एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना खेळविले जाणार आहेत.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदानावर पाणीच पाणी झाले होते. बुधवारी पाऊस थांबल्यावर मैदान खेळण्यासाठी अनुकूल बनविण्याचे प्रयत्न केले गेले होते. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने मैदानावर आच्छादन टाकले गेले होते. पंचांनी वारंवार पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाऊस सुरूच राहिल्याने सामना रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. याच दोन्ही संघात गतवर्षी याच मैदानावर होणारा टी-20 सामनादेखील असाच पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
वेळापत्रक :
दुसरा एकदिवसीय सामना : 15 मार्च, लखनौ
तिसरा एकदिवसीय सामना : 18 मार्च, कोलकाता