बिहारमधील गोपालगंज येथील काकरकुंड या छोट्याशा गावात राहणाऱ्या मुकेश कुमारची ( Mukesh Kumar ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी (IND VS SA ODI) निवड झाली आहे. या मालिकेतील पहिला वनडे ६ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. इराणी कपमध्ये शेष भारताकडून खेळताना मुकेश कुमारने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे शेष भारताने सौराष्ट्रचा ८ गडी राखून पराभव करत इराणी चषक जिंकला. खासकरून मुकेश कुमारसाठी हा सामना अविस्मरणीय ठरला आहे.
एकीकडे मुकेशने ( Mukesh Kumar ) सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावात चार बळी घेत शेष भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर दुसरीकडे त्याची एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना मुकेश म्हणाला की, ‘माझ्या मोबाईलवर अचानक मेसेज आला की तू भारतीय संघाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील झाला आहेस. त्यानंतर संघात निवड झाल्याबद्दल सर्वांकडून माझे अभिनंदन करण्यात आले.’
मुकेश कुमारने ( Mukesh Kumar ) पुढे सांगितले की, ‘ मला जेव्हा कळले की माझी भारतीय संघात निवड झाली आहे, तेव्हा मी लगेच माझ्या आईला फोन केला. माझी निवड झाल्याचे ऐकताच आईला आनंदाने रडू कोसळले. माझ्या आईने मला क्रिकेटर बनण्यात खूप मोठी मदत केली आहे. आई मला क्रिकेट खेळण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करायची. पण वडिलांना वाटायचं की मी एखादी सरकारी नोकरी करावी.’ ( India vs South Africa ODI Mukesh Kumar directly selected to Team India without playing a single IPL match )
‘मी जेव्हा रणजी क्रिकेटमध्ये सामना खेळलो तेव्हा वडिलांनाही खूप आनंद झाला होता. माझी भारतीय संघात निवड झाली ही बातमी ऐकायला ते आज असते तर त्यांना अतिशय आनंद झाला असता.’ मुकेशची निवड झाल्यानंतर त्याला सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा मिळाल्या. त्याने २०१५ साली बंगालकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.