भारतातील करोनाबाधितांची संख्या चीनपेक्षा दुप्पट

मृतांचा आकडाही शेजारी देशापेक्षा अधिक

नवी दिल्ली: भारतात एकाच दिवसात 7 हजार 466 इतक्‍या उच्चांकी प्रमाणात नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. आता भारतातील करोनाबाधितांची संख्या चीनपेक्षा दुप्पट झाली आहे. त्याशिवाय, मृतांच्या संख्येतही भारताने चीनला मागे टाकले आहे.

चीनमध्ये सर्वप्रथम मागील वर्षीच्या अखेरीस करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर त्या विषाणूचा फैलाव जगभरात झाला. आता चीनमध्ये करोनाचा फैलाव नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. मात्र, इतर देशांमध्ये करोनाने कहर केला आहे. त्यामुळे करोनाबाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत चीन थेट पंधराव्या स्थानावर फेकला गेला आहे. भारताने गुरुवारीच तुर्कीला मागे टाकून त्या क्रमवारीत नववे स्थान मिळवले. त्यानंतर शुक्रवारी भारतातील करोनाबाधितांची संख्या चीनपेक्षा दुप्पट झाली. चीनमध्ये सुमारे 83 हजार करोनाबाधित आहेत. त्या देशात करोनाने आतापर्यंत 4 हजार 634 बाधितांचा बळी घेतला आहे. ती संख्याही भारताने ओलांडली. भारतात 22 मेपासून आठवडाभर दररोज 6 हजारहून अधिक करोनाबाधितांची भर पडली. त्यानंतर प्रथमच करोनाबाधितांची संख्या 7 हजारपेक्षा अधिक वाढली. त्याशिवाय, एकाच दिवसात भारतात करोना संसर्गामुळे 175 बाधितांचा मृत्यू झाला.

भारतातील सक्रिय बाधितांची संख्या 90 हजारहून अधिक आहे. तर आतापर्यंत सुमारे 72 हजार बाधित करोनामुक्‍त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे ते प्रमाण 43 टक्‍क्‍यांजवळ पोहचले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची मुदत 31 मे यादिवशी समाप्त होणार आहे. मात्र, बाधित आणि बळींची वाढती संख्या पाहता ती मुदत वाढण्याची चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.