कार्यकर्त्यांकडून होतेय प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन

मुख्याधिकाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष 

सुनिता शिंदे
कराड  – लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथीलता देण्यात आली असली तरी काही बंधनेही घालण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यास एक हजार रूपयांचा दंड ठेवण्यात आला आहे. हा नियम सर्वांसाठी सारखाच असताना कराड नगरपालिकेत मात्र, याच नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. पालिकेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनीच हा प्रकार केल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्‍त होत आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथीलता देत असतानाच मास्क न घातल्यास 500 रूपयांचा दंड, रस्त्यावर थुंकल्यास 1000 हजार रूपयांचा दंड असे नियम करण्यात आले आहेत. हे सर्व नियम सर्वसामान्य नागरिकांसह अधिकारी, पदाधिकाऱ्यांसाठी एकच आहेत. मात्र, चक्क पालिकेच्या इमारती परिसरातच शासनाच्या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.

शुक्रवारी दुपारी पालिकेच्या एका पदाधिकाऱ्यास त्याचे कार्यकर्ते भेटावयास गेले होते. वास्तविक पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या सभागृहात नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी यांनाच बसण्यास परवानगी असते. असे असतानाही संबंधित नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सदर सभागृहात जाऊन चर्चा करू लागले. हे नियमाला धरून नव्हते. मात्र, पदाधिकाऱ्यांसाठी सारेकाही अलबेल असते. या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर त्यांचे कार्यकर्तेही बडेजाव पणाचा आव आणताना दिसतात.

संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते स्थायी समितीच्या सभागृहात बोलत उभे राहिले होते. त्यातील एका कार्यकर्त्याने सभागृहाच्या खिडकीतून खाली न पाहता गुटख्याची पिचकारी मारली. खाली उभे असणाऱ्या एका नागरिकांच्या अंगावर ती थुंकी पडली. त्याचा जाब विचारण्यासाठी सदर व्यक्‍ती गेली असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांकडूनच मध्यस्थी करण्यात आल्याचे समजते.

कराड तालुक्‍यासह जिल्ह्यात करोनाने थैमान घातले आहे. एकीकडे शासन सर्व नियमांचे काटेकोर पालन करा असे सांगत आहे. नागरिकांबरोबरच प्रशासनाचे अधिकारी व पदाधिकारी यांनीही या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. चूक करणारी व्यक्‍ती कितीही जवळची असलीतरी तिला शिक्षा करणे गरजेचे आहे. कारण सध्य परिस्थितीत ही छोटीसी चूक खूप महागात पडू शकते याची जाणीव होणे आवश्‍यक होते.

वास्तविक पाहता संबंधित पदाधिकाऱ्याने मध्यस्थी करण्याऐवजी कार्यकर्ता असलातरी त्याच्याकडून दंड वसूल करणे आवश्‍यक होते. असे झाले तरच सर्वसामान्य नागरिकांवरही वचक बसू शकतो. मात्र, तसे न झाल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्‍त होत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून संबंधित कार्यकर्त्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील नियमांच्या माहितीचे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्यास 1 हजार रूपयांचा दंड आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून असा प्रकार घडला असता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लगेच दंड वसूल करून त्याची सर्वत्र जाहिरात केली असती. मात्र, पालिकेच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांने कायद्याचे उल्लंघन केले आहे. अशा परिस्थितीत मुख्याधिकारी सर्वांसाठी एकच नियम ठेवणार की पदाधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार संबंधिताला पाठीशी घालणार या भुमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच संबंधित कार्यकत्याकडे गुटखा नक्की आला तरी कोठून असाही प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.