भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर

संयुक्‍त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेतील आक्षेप फेटाळले

जिनिव्हा – संयुक्‍त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेमध्ये पाकिस्तानने भारतावर केलेल्या आरोपांना आज भारताच्यावतीने सडेतोड उत्तर देण्यात आले. जम्मू काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा पाकिस्तानच्या मानवी हक्क मंत्री शिरीन मिझारी यांनी मानवी हक्क परिषदेतील भाषणामध्ये केलेला आरोप संयुक्‍त राष्ट्रातील कायमस्वरुपी मिशनमधील दुसऱ्या सचिव सीमा पुजानी यांनी फेटाळून लावला. पाकिस्तान सरकारने सर्वप्रथम राज्य पुरस्कृत दहशतवादावर प्रभावी कारवाई करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे त्या “राईट टू रिप्लाय’ दरम्यान म्हणाल्या.

पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांची स्थिती अतिशय वाईट आहे. तेथे संस्था पातळीवरील भेदभाव आणि अल्पसंख्यांकांविरोधातील छळ अव्याहतपणे सुरू आहे.
भारताविरूद्ध निराधार आणि द्वेषयुक्त प्रचार करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने विविध व्यासपिठांचा गैरवापर करत आहे, हे काही नवीन नाही असेही त्या म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना आणि दहशतवाद्यांचा पाकिस्तान हा सर्वात मोठा देश संरक्षक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या 126 व्यक्ती आणि 24 संस्था या पाकिस्तानशी संबंधित आहेत, असेही पुजानी यांनी सुनावले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.