रोहिंग्यांच्या बोटीचा ठावठिकाणा नाही…

90 शरणार्थींनी दोन आठवड्यांपूर्वी सागरी प्रवासाला केली सुरुवात

ढाका – बांगलादेशातून सुरक्षित आश्रयस्थानी जाण्यासाठी निघालेले रोहिंग्या शरणार्थी अन्न आणि पाणीही नसलेल्या बोटीत भर समुद्रात अडकले असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. हे रोहिंग्ये अतिशय संकटात असून बोटीतील काही जण मरण पावले असल्याची भीती या शरणार्थ्यांच्या नातेवाईकांनी व्यक्‍त केली आहे. ही बोट दोन आठवड्यांपूर्वी निघाली होती. मात्र ही बोट सध्या समुद्रात कोठे आहे, याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे शरणार्थ्यांसाठीच्या संयुक्‍त राष्ट्राच्या उच्चायुक्‍तलयाने (युएनएचसीआर) म्हटले आहे. या बोटीतील अनेक शरणार्थी आजारी होते. त्यांना अतिसाराचा त्रास होत होता, असे संयुक्‍त राष्ट्र आणि ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेने म्हटले आहे.

अधिक चांगल्या ठिकाणी आश्रय मिळविण्याच्या काही मुलांसह सुमारे 90 शरणार्थींनी दोन आठवड्यांपूर्वी या सागरी प्रवासाला सुरुवात केली होती. निर्वासितांना आग्नेय आशियाई देशांमध्ये काम करण्याचे आमिष मानवी तस्करांकडून अनेकदा दाखवले जाते.

म्यानमारमधील सुमारे 10 लाख रोहिंग्ये बांगलादेशातील आश्रय शिबिरांमध्ये दाटीवाटीने रहात आहेत. म्यानमारमधील लष्कराने 2017 मध्ये केलेल्या घुसखोरी विरोधी कारवाईनंतर सुमारे 7 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात पलायन केले आहे. या रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत पाठवण्यासाठी बांगलादेश प्रयत्नशील आहे. मात्र म्यानमारकडून संरक्षण मिळण्याची हमी नसल्याने रोहिंग्यांनी तेथे परत जाण्यास नकार दिला आहे.

अलिकडील काही दिवसात बांगलादेशच्या समुद्रातून रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या बोटीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, असे बांगलादेशातील कॉक्‍स बाजार जिल्ह्यातील टेकनाफचे पोलिस प्रमुख हाफिझूर रेहमान यांनी मंगळवारी सांगितले. या शरणार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय तटरक्षक दलानेही पथक रवाना केले असल्याचे “युएनएचसीआर’ने म्हटले आहे. भारतीय तटरक्षक दल या शरणार्थ्यांना वाचवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल “यूएनएचसीआर’च्या रिअनल ब्युरो फॉर एशिया आणि पॅसिफिकच्या प्रवक्‍त्या कॅथरीन स्टुबरफील्ड यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

या शरणार्थ्यांच्या बोटीबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नसून त्यांचा शोध सुरू आहे, असे भारतीय तटरक्षक दलाचे प्रवक्‍ते पीएन अनुप यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.