मुंबई – महाविकास आघाडीत भरतीला सुरूवात झाली आहे. एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे आणि अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज मिरा-भाइंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
गीता जैन या मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार आहेत. जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकदेखील प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे.
गीता जैन यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपामधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता.
गीता जैन यांचं मीरा भाईंदर भागात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. शिवसेनाला गीता जैन यांच्या पक्षप्रवेशाने मोठा फायदा होणार आहे. निवडणुकीत शिवसेनेने जैन यांना मदतही केली होती. माहाविकास आघाडीत होणाऱ्या या भरतीमुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे.