कराड बाजार समितीत उंडाळकर चव्हाण गटाची सत्ता, भोसले पाटील गटाचा पराभव
कराड – शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्याच हातात रहावी, अशी आमच्या पॅनलची असलेली अपेक्षा आज सभासदांनीच पूर्ण केली. प्रत्येक पद आपल्याच घरात पाहिजे या विचाराला सभासदांची चपराक दिली असून अभद्र युतीला सभासदांनी नाकारल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे मत काँगेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीत लोकनेते विलास काका पाटील रयत पॅनलच्या विजयाप्रित्यर्थ आभार व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी रयत पॅनलचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, उत्तरेतील नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, गजानन आवळकर व विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या निवडणुकीत लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर गटाने कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आपली सत्ता कायम राखत १२ जागांवर विजय मिळवला. तर विरोधी डॉ. अतुल भोसले व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या रयत पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर उंडाळकर गटाने दक्षिणेतून किरकोळ आघाडी घेतली. त्यानंतर मात्र रयत विकास पॅनलच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याने सर्वत्र बाजार समितीत परिवर्तन होणार असल्याची चर्चा सुरू झाल्याचे दिसून आले.
परंतु, ऐनवेळी लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनलच्या उमेदवारांनी विरोधकांचे मताधिक्य कमी करत निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर काही वेळातच निकालाचे चित्र स्पष्ट झाले. अखेर सत्ताधारी गटाने आपली सत्ता कायम राखत १२ जागांवर विजय मिळवला. तर विरोधकांना केवळ ६ जागा घेता आल्या. विजयानंतर सत्ताधारी गटाचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गुलालाची उजळणी करत जल्लोष केला. त्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी सभा घेण्यात आली. यामध्ये उदयसिंह पाटील-उंडाळकर, मनोज घोरपडे, अजित पाटील-चिखलीकर, रामकृष्ण वेताळ, मनोहर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांनी सर्व मतदारांचे आभारही मानले.
तद्नंतर कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या ऐतिहासिक विजयानंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस पक्षाने नुकतीच नेमणूक केली आहे. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या देशभरातील 40 दिग्गज काँग्रेस नेते कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत पूर्ण वेळ देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कराड तालुक्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद निहाय मतदारांच्या मेळाव्यात आ. चव्हाण यांनी या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीसारखी रंगत आणली व बाजारसमितीची निवडणूक गावागावात घराघरात पोहचली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलने 12 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवीत विजय खेचून आणला.