रेडा -इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळत सुरक्षित अंतराचे पालन करावे. जर नागरिकांनी खबरदारी घेतली तर इंदापूर तालुका सद्यस्थितीला लॉकडाऊन करणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
भरणे म्हणाले की, विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, पंचायत समितीच्या आरोग्य विभागासह इतर कर्मचाऱ्यांनी करोनाचा ग्रामीण भागात कोठेही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दक्ष राहून काम करणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात एकूण 32 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, हे सर्व रुग्ण ठणठणीत बरे होतील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे दिलीपराव पवार, भिगवण पोलीस स्टेशनचे जीवन माने, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
व्यापारी, विक्रेत्यांना पुरवले मास्क
इंदापूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात भरणे यांना इंदापूर शहरातील व्यापारी व विक्रेते तोंडाला मास्क काही प्रमाणात वापरत नाहीत, अशी तक्रार आढावा बैठकीत उपस्थितांकडून करण्यात आली. त्यावेळी आपल्या गाडीतील शेकडो मास्क तात्काळ विक्रेत्यांना मोफत वाटण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आढावा बैठक सुरू असतानाच शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांना मास्कचे वाटप करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी तात्काळ मोफत मास्कचे वाटप केले. याची शहरात दिवसभर चर्चा होती.