पाचगणी – गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील 52 वर्षे वयाच्या मृताच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या करोना चाचण्यांचे अहवाल काल (दि. 16) रात्री उशिरा आले. त्यामध्ये आणखी नऊ जण बाधित असल्याने गावात खळबळ उडाली आहे. गोडवलीतील बाधितांची एकूण संख्या 12 झाली आहे.
त्या पाठोपाठ भिलार येथील 68 वर्षांच्या वृद्धाचा कोव्हिड चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. गावात करोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाचगणीतही दोन बाधित आढळल्याने परिसरातील बाधितांची संख्या 15 वर गेल्याने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
गोडवलीतील भाजी विक्रेत्याचा काही दिवसांपूर्वी अचानक मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचा नमुना घेता आला नव्हता. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या कटुंबातील चौघांच्या घशातील स्राव घेतले होते. त्यातील तिघे पॉझिटिव्ह आले होते.
या बाधितांच्या निकट सहवासातील, मृताच्या अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या आणि पाचगणीतील भाजी मार्केटमध्ये संपर्कात आलेल्या, अशा 49 आणि दापवडी (ता. जावळी) येथील बाधिताच्या संपर्कात आलेले पाचगणीतील दोन, अशा 51 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 12 जणांचे अहवाल गुरुवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. त्यानंतर गोडवलीतील 29 जणांना शुक्रवारी महाबळेश्वर कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गोडवली गाव प्रशासने या आधीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सपोनि सतीश पवार यांनी गावाला भेट दिली. ग्रामपंचायतीकडून जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली असून आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, करोना दक्षता समिती व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावात फिरून जनजागृती केली.
भिलारमध्ये उपाययोजना भिलार येथेही करोनाबाधित वृद्ध आढळल्याने गावात येणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. बाधित वृद्ध मार्चमध्ये मुंबईतून आला होता. तो काही दिवसांपूर्वी आजारी पडल्याने त्याला पाचगणीतील खाजगी दवाखान्यात नेले असता, तेथील डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले होते. तेथून त्याला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आता या बाधिताच्या अतिसंपर्कातील आठ जणांना महाबळेश्वर येथील राज भवनातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य सहाय्यक सोनवणे यांनी दिली. तहसीलदार सुषमा पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सपोनि सतीश पवार, तलाठी शशिकांत वणवे,ग्रामसेवक हेमचंद्र सोनवणे यांनी गावात पाहणी केली. संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.