रेडा – इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती सुधारणा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुधार आराखड्यातून तब्बल साडेआठ हजार कोटींचा निधी मिळणार असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
काटी-वडापुरी जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार भरणे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, मंगल सिद्धी परिवाराचे प्रमुख ऍड. राजेंद्र तांबिले, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जि.प.चे सदस्य अभिजीत तांबिले, पं.स.चे सदस्य सतीश पांढरे, किसनराव जावळे, छगनराव तांबिले, संपत पवार, हामा पाटील, नितीन जगताप, वसंत आरडे, छाया पडळकर आदी उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले की, मी विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील सातत्याने पाठपुरावा करून कामे मार्गी लावत आहे; त्यामुळे कोणती कामे करतो, याकडे मला लक्ष द्यायची गरज नाही. येत्या आठ दिवसात समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून तालुक्यातील मोठ्या निधीची खुशखबर आपल्याला कळेल. गेल्या 35 वर्षांत पुनर्वसनाचा निधी इंदापूर तालुक्यात कधीही आलेला नाही. मात्र, या भागातील पुनर्वसित गावांचा विकास करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून कामे सुरू झाले आहेत.
सभापती अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन सरकारचे नसल्यामुळे बॅकवॉटर परिसरातील गावांना मागील काही महिन्यांपासून पाण्याचे संकट सोसावे लागत आहे. नीरा नदीवरील तावशी गावापासून नीरासिंगपूर पर्यंत पाणी सुसाट वेगाने कर्नाटकला वाहून जाते. या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही, त्यामुळे बंधारे निर्माण होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सभापती जगदाळे यांनी व्यक्त केली. यावेळी अभिजीत तांबिले, राजेंद्र तांबिले, महारुद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.