इंदापूर- इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले असून, मंगळवार (ता.15 फेब्रुवारी) रोजी मंत्रालय मुंबई येथील उपमुख्य मंत्र्यांचे कार्यालय येथे सकाळी साडेअकरा वाजता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व संबंधित विभागाचे वरिष्ठ सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अगोदर कामगारांचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी,इंदापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कर्मचाऱ्यांचा अनेक दिवसापासून रेंगाळत असणार प्रश्न मार्गी लागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रांगणात आंदोलन उभे केले होते.
यावेळी प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात यशस्वी प्रयत्न करण्याचा शब्द सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला असल्यामुळे,संबंधित कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.याच शब्दाची उतराई करण्याकरता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यमंत्री भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या या पाठपुराव्यामुळे विशेष बैठकीच्या माध्यमातून यश मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
इंदापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.यामध्ये कामगारांचा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा प्रश्न मानला जातो.या महत्त्वाच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसलेली दिसते.थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिल्यामुळे कामगारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा तमाम इंदापूरकर करत आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्या दालनातील बैठकीसाठी, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव,वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव,सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य अप्पर सचिव, तसेच व्हिसीद्वारे इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्य अधिकारी इंदापूर नगरपालिका बैठकीसाठी जोडले जाणार आहेत.