पुणे( प्रतिनिधी) : इंदापूर येथे चिंकारा या प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी पुणे वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी दोन आरोपीना पकडले. त्यांच्याकडे गोणीमध्ये चिंकारा जातीचे रक्ताने माखलेले नर हरीण मृत अवस्थेत आढळले.
पुणे वनविभागांतर्गत असलेल्या इंदापूर वनपरिक्षेत्रातील मौजे काझड येथील बोरी फिरंगाई मंदिर रस्त्यावर मंगळवारी (दि.18) रात्री वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना वन क्षेत्रात टॉर्च’चा प्रकाश दिसल्यामूळे संशय निर्माण झाला. त्याठिकाणी असलेल्या दोन व्यक्तीचा पाठलाग करून त्यांना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले.
त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये रक्ताने माखलेला मृतावस्थेतील चिंकारा तसेच एक ९ बोअर’ची रायफल ६ जिवंत काडतुस व १ वापरलेले काडतूस पुंगळी तसेच युनिकॉन कंपनीची मोटासायकल क्र. एम एच ४२ एव्ही २१११ आढळून आली.
या आरोपींची नावे महेश जंगलू मने, वय ४० (रा.सनसर ता. इंदापूर,) व दत्तात्रय पोपट पवार वय ४२ (रा. बोरी, ता. इंदापूर) अशी असून, आरोपींना चिंकारा शिकार प्रकरणी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (ड) (१) व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ वे कलम २ (१६),९,११ व ५१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक आशुतोष शेंडगे, पुणे, इंदापूर वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अशोक नरुटे, वनरक्षक पूजा काटे यांनी केली. यासाठी वनविभागाला ग्रामस्थ अतुल नरुटे, विनोद नरुटे आणि संदीप नरुटे यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास इंदापूर वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे करणार आहेत.
वन्यजीवांची तस्करी अथवा शिकारीबाबत कोणतीही माहिती मिळाली असल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या वनविभाग कार्यलयाचे अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती कळवावी, तसेच वनविभागाच्या 1926 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक पाटील यांनी केले.