IND vs ENG 3rd Test – आयपीएल स्टार देवदत्त पडीक्कल याला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, मुळातच संघात सर्फराज खानसारखे सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या खेळाडूची निवड करण्यात आल्याने पडीक्कलला अंतिम संघात स्थान मिळणार का हाच मोठा प्रश्न आहे. लोकेश राहुल या कसोटीत खेळू शकणार नसल्याने पडीक्कलचा समावेश करण्यात आला आहे.
राहुलच्याच जागी आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या पडिक्कलचा संघात समावेश करण्यात आला आहे. पडीक्कल सध्या देशांतर्गत रणजी करंडक स्पर्धेत चांगला भरात आहे. त्याने ८ पैकी पाच सामन्यात शतके फटकावली आहेत. त्यामुळेच त्याची संघात निवड करण्यात आली आहे. तिसरा सामना येत्या गुरुवारपासून राजकोट येथे सुरु होत आहे. या मैदानाचा इतिहास फलंदाजीला पोषक असल्याने राहुलचे संघात नसणे भारतीय संघासाठी चिंताजनक ठरणार आहे.
राहुलच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाची मधली फळी कमकुवत झाली आहे. श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तसेच विराट कोहलीच्या जागी संघात आलेला रजत पाटीदारहीकाही चमक दाखवू शकलेला नाही. त्यामुळेच यष्टीरक्षक ध्रुव जुरेलसह सरफराज खानला संघात संधी मिळाले अशी शक्यता बळावली असल्याने पडीक्कलला बेंचवरच बसून राहावे लागण्याची शक्यता आहे. राहुल तंदुरुस्त असला तरीही संघ व्यवस्थापनाने त्याला आणखी एक आठवडा विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल चौथ्या कसोटीसाठी संघात असेल. त्यातच रवींद्र जडेजाही पूर्ण तंदुरुस्त असल्याने संघात परतत आहे. त्याने भारतीय संघासह राजकोटमध्ये सरावही केला.
कोहलीची उणिव भासणार
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने या संपूर्ण मालिकेतूनच माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणाने त्याने हा निर्णय घेतला असून त्याला बीसीसीआयने मान्यताही दिली आहे. मात्र, कोहली गेल्या मोसमापासून सातत्याने धावा करत होता. या मालिकेतील तिसर्या सामन्यापासून तो संघात परतेल अशी आशा होती मात्र, त्याने पूर्ण मालिकाच खेळणार नसल्याचे सांगितल्याने संघाला त्याची णिव जास्त जाणवणार आहे.
इंग्लंडला विजयाची संधी – ब्रॉड
विराट कोहली, लोकेश राहुलसारखे दीग्गज फलंदाज तिसर्या कसोटी खेळणार नसल्याने या मालिकेत आघाडी घेण्याची मोठी संधी इंग्लंड संघाला आहे, असा विश्वास इंग्ंडचामाजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यान व्यक्त केला आहे. भारतात भारतीय संघाला पराभूत करणे कठीण असते मात्र, महत्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरणारा भारतीय संघ यावेळी दुबळा दिसत आहे व हीच इंग्लंडसाठी नामी संधी आहे, असेही ब्रॉड म्हणाला.