अमेरिकेच्या मतदारांनी ज्यो बायडेन यांच्याकडे देशाची सूत्रे सोपवली आहेत, पण विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांनी इशारे देणे आणि खलिते जारी करण्याचे काम सुरूच ठेवले आहे. त्यातच आता नव्या बातम्या अनिश्चिततेत भर टाकणाऱ्या ठरत आहेत. ट्रम्प यांचे मनसुबे काही चांगले नाहीत असे त्यातून प्रतित होत आहे.
ट्रम्प यांची पुतणी मेरी ट्रम्प यांनी केलेले ट्विट तर लोकशाहीप्रेमी नागरिकांची चिंता वाढवणारेच आहे. ट्रम्प “तख्तापालट’ करण्याच्या तयारीत आहेत. सावध राहा, असे मेरी यांनी म्हटले आहे. गेल्या काही तासांत ट्रम्प यांनी जो अगोचरपणा चालवला आहे, त्या पार्श्वभूमीवर मेरी यांनी दिलेला इशारा योग्यच आहे. त्याचे कारण असे की पराभव झाल्यावर केवळ सूत्रे नव्या नेत्याकडे सोपवण्याची औपचारिकता राहिलेली असते. असे असताना पराभूत झालेल्या, मात्र तांत्रिकदृष्ट्या विद्यमान असलेल्या व्यक्तीने कोणताही मोठा निर्णय घ्यायचा नसतो. ते देशहिताच्या दृष्टीने योग्य नसते. नैतिकदृष्ट्याही ते अयोग्य असते अन् भविष्यात त्या देशाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारेही असते.
काही देशांनी नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन यांचे अभिनंदन केले. मात्र रशिया किंवा चीन या देशांनी अद्याप तसे केलेले नाही. अन्य देशांनी बायडेन यांचा अधिकृतपणे स्वीकार करणे वेगळे. चीन आणि रशियाने तसे करणे वेगळे. शीतयुद्धाच्या काळापासून अमेरिकेला रशिया हाच एक प्रबळ स्पर्धक राहीला आहे. आता त्यात चीनचीही भर पडली. किंबहुना आज रशियापेक्षाही चीनच्या प्रतिक्रियेला महत्त्व अधिक आहे. कारण अमेरिकेला टक्कर देण्याची वा मागे टाकण्याचीही क्षमता या देशाने प्राप्त केली आहे. जर तो देश बायडेन यांचे अद्याप स्वागत करत नसेल तर एकवेळ ते ट्रम्प यांना सुखावणारे ठरूही शकते, तथापि, त्यामुळे अमेरिकेच्या एकूणच प्रतिष्ठेला लांछन आणणारे आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या प्रतिमेवर बोळा फिरवणारे आहे.
मेरी ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे डोनाल्ड यांची पावले खरेच वाकडी पडत आहेत. सर्वप्रथम त्यांनी संरक्षण मंत्री माईक एस्पर यांना पदावरून हटवले. त्यानंतर इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी सुरू आहे. एस्पर यांच्या जागी क्रिस्टोफर मिलर या आपल्या समर्थकाची त्यांनी वर्णी लावली आहे. त्याहून धक्कादायक निर्णय म्हणजे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना दहशतवादी म्हणणाऱ्या जिम्मा अँथनी टाटा यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाच्या कार्यवाहक धोरण प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळीही ट्रम्प समर्थकांनी सशस्त्र गर्दी केली होती. या सगळ्याच बाबी अचंबित करणाऱ्या आहेत. अमेरिका एक स्वतंत्र आणि शक्तिशाली राष्ट्र आहे. आपल्या बळावर त्यांनी आपले हित साधले. क्वचितप्रसंगी जगात दादागिरीही केली. मात्र त्या देशाचे एक वैशिष्ट्य आहे.
लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकार यांना तेथे सर्वोच्च प्राधान्य असते. अमेरिका हा अमाप संधींचा देश आहे. कर्तृत्व आणि पात्रता असेल तर अशा बुद्धिवंतांचे तेथे सोने होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. अमेरिकेच्या व्यापारी वृत्तीवर, बेरकीपणावर आणि रगेलपणावर बोट ठेवताना त्यांच्या या जमेच्या बाजूही गृहीत धरल्या जातात. हे सगळे असताना पराभूत झालेले विद्यमान अध्यक्ष जर सत्तेचे हस्तांतरण करताना इतका छचोरपणा दाखवत असतील तर त्याचे केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहेत. मुळात तद्दन व्यावसायिक असलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या चौकटीत बसणारेच नव्हते.
गेल्या चार वर्षांतील त्यांचे अचाट कर्तृत्व याची साक्ष देते. कोणत्याही मुद्द्यावर त्यांची भूमिका ठाम राहिल्याचे दिसले नाही. त्यांच्या अगोदरच्या अध्यक्षांनी जागतिक संघटनांवर अमेरिकेचा जो अंकुश प्रस्थापित केला होता तो ट्रम्प यांनी शब्दश: खिळखिळा केला. फार मागे जायला नको. अगदी ट्रम्प यांनी ज्यांच्याकडून सूत्रे स्वीकारली त्या ओबामांचा आजही अमेरिकेत आणि जगाच्या राजकारणावर प्रभाव आहे. तसे जर नसते, तर त्यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या प्रचारामुळे बायडेन यांची सरशी झाली नसती. बायडेन विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. ओबामा यांच्यापेक्षाही जास्त मते त्यांनी मिळवली आहेत. ट्रम्प यांनाही कोणत्याही पराभूत उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तोही एक विक्रमच आहे. मात्र, पराभव हा पराभव असतो व तो विनम्रपणे स्वीकारायचा असतो. प्रमुख, घटनात्मक पदांवर असणाऱ्या व्यक्तींची कार्ये आणि जबाबदाऱ्या ठरलेल्या असतात. ज्या गोष्टी लिखित स्वरूपात असतात त्या पाळल्या जातात. मात्र त्याहीपेक्षा जास्त अशा अनेक गोष्टी असतात की ज्या अलिखित असतात. त्यांचे संकेत असतात. ते देशहिताशी, देशाच्या प्रतिमेशी निगडीत असतात. त्यांची जाहीर वाच्यता करायची नसते, केली जातही नाही. मावळत्याने उगवत्याकडे सूत्रे सोपविताना ती गुपिते त्याच्या कानात सांगायची असतात. पण मावळता हटायलाच तयार नसेल तर ते विघ्न फार मोठे असते.
ट्रम्प यांनी हे सर्व संकेत धुडकावले आहेत. त्यांनी आपल्या कार्यशैलीमुळे अनेक विरोधक तयार केलेत. मात्र हेही तितकेच खरे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर समर्थकही मिळवले. आज अमेरिकेतील माध्यमे असोत वा बुद्धिवादी वर्ग किंवा सामान्य मतदार यांच्यात उभी फूट पडलेली दिसते. काही मोजके विषय सोडले, तर प्रत्येकच विषयावर ही फूट निदर्शनास येते. हे चित्र चांगले नाही. सत्तातारांच्या वेळी जर ते सुरळीत झाले नाही, तर अनागोंदी स्थिती निर्माण होईल, असा इशारा ज्येष्ठ संसद सदस्यांनी निवडणुकीच्या अगोदर सप्टेंबरमध्येच दिला होता. त्यांची ती भीती खरी ठरताना दिसते आहे. करोनाच्या काळात अगोदर करोनाची आणि नंतर मास्क घालणाऱ्यांची टवाळी ट्रम्प यांनी केली. त्यांच्या अविचारी कृतीमुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे लाखो अमेरिकी नागरिकांचा जीव गेला व लाखोंच्या संख्येने लोक बाधित झाले. इतका अविचार कोणी राष्ट्रप्रमुख दाखवू शकतो हेच अमेरिकेला हादरवणारे होते. मात्र त्या व्यक्तीच्या चुकीने जे बळी गेले ते दुसऱ्या महायुद्धात अथवा अन्य कोणत्या युद्धात गेलेल्या बळींपेक्षाही जास्त होते. चौकटीत राहायचेच नाही, अगोदरचे सगळे चूक आणि माझे सगळेच बरोबर असा अविर्भाव आणत ट्रम्प यांनी जो आततायीपणा केला त्याची किंमत अमेरिकेला मोजावी लागली.
जगभरात त्या देशाने आपल्या कौशल्याने, ताकदीने आणि मुत्सद्दीपणाने जी शक्तिस्थाने निर्माण केली होती, ती सगळी खिळखिळी करण्याचेच काम ट्रम्प यांनी केले. त्याचा हिशेब मतदारांनी केला. पण तोही ट्रम्प यांना अमान्य आहे. ते तूर्त अध्यक्ष आहेत. बायडेन नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत. ट्रम्प यांची मुदत 20 जानेवारी 2021 रोजी संपते. त्यांनी आपला हेका कायम ठेवला आणि मनमानी निर्णय चालूच ठेवले, तर त्यांना व्हाइट हाऊसमधून हुसकावण्याची तरतूद अमेरिकेच्या घटनेत आहे. आम्ही व्हाइट हाऊसमध्ये आमचे प्रशासन आणण्याची तयारी करत आहोत.
ट्रम्प जे काही करत आहेत, ते त्यांना 20 जानेवारी रोजी नैराश्यात नेणारे ठरेल असे सूचक वक्तव्य बायडेन यांनी केले आहे. त्याचा मतितार्थ ट्रम्प यांनी समजून घ्यावा. अमेरिकेची लोकशाहीवादी आणि मानवाधिकारांचे रक्षण करणारी ही जी प्रतिमा आहे ती त्यांनी तशीच राहू द्यावी. अजूनही फार वेळ गेलेली नाही.