पिंपरी – महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात असलेल्या शवविच्छेदन केंद्राची (पोस्टमार्टेम सेंटर) क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच, येथील शीतगृहात 60 मृतदेह ठेवण्याची सोय केली जाणार आहे.
वायसीएम रुग्णालयात सध्या कार्यरत असलेल्या पोस्टमार्टेम सेंटरमध्ये 4 डिसेक्शन टेबलची सोय केलेली आहे. पोस्टमार्टेम सेंटरसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीत 9 डिसेक्शन टेबलची सोय असणार आहे.
सध्या येथील शीतगृहात 24 मृतदेह ठेवण्याची सोय आहे. नवीन इमारतीतील केंद्रात असलेल्या शीतगृहात एकाच वेळी 60 मृतदेह ठेवण्याची सोय होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी झालेल्या विविध दुर्घटनांतील मृतदेहांना येथे व्यवस्थित ठेवता येणार आहे. सध्या येथे दररोज 10 ते 15 मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते.
पोस्टमार्टम सेंटरचे काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर हॉल, संग्रहालय, हॉल, कार्यालयासाठी जागा, रेकॉर्ड रूम आदी सुविधा असणार आहेत. येथे विव्हींग गॅलरीतून विद्यार्थ्यांना शवविच्छेदन पाहण्याची सोय केली जाणार आहे. त्याशिवाय, तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानासाठी व्याख्यान कक्ष उभारला जाणार आहे.