संजय कडू
पुणे – पुणे जिल्ह्याच्या लोहमार्ग हद्दीत रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्या परराज्यातून रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे वाढत आहेत. जशा झोपडपट्ट्या वाढत आहेत तसे रेल्वे रुळालगत आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2018 ते 2023 या कालावधीत रेल्वे रुळालगत आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या कालावधीत तब्बल 133 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी 118 पुरुष आहेत.
सर्वाधिक आत्महत्या तणावामुळे
या आत्महत्येमागील कारणांचा मागोवा घेतला असता, आजारपण, मनोविकार, प्रेमसंबंध, नोकरी, अपयश, व्यसन, कौंटुबिंक कलह, मानसिक तणाव, आर्थिक कारण, विद्यार्थी आत्महत्या आणि हुंडावळी ही बाब लक्षात आली. या 133 आत्महत्येंपैकी सर्वाधिक आत्महत्या म्हणजेच 25 आत्महत्या मानसिक तणावामुळे झाल्या. त्यात 22 पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. त्याची एकूण टक्केवारी 19 टक्के इतकी आहे. त्यातील 13 पुरुष हे 16 ते 30 वयोगटातील आहेत.
या वयोगटातील पुरुष सर्वाधिक मानसिक तणावामुळे आत्महत्या करतात. तर त्या पाठोपाठ 18 आत्महत्या आजारपणाला कंटाळून करण्यात आल्या. यामध्ये 14 पुरुष व दोन स्त्रिया आहेत. याची टक्केवारी 14 इतकी आहे. यात 41 ते 50 वयोगटातील 7 पुरुषांचा समावेश आहे. तर आत्महत्येचे तिसरे महत्वाचे कारण हे आर्थिक आहे. यामुळे बारा जणांनी आत्महत्या केल्या असून त्यात 11 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या 31 ते 50 वयोगटातील आहेत.
“रेल्वे रुळालगत आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, लोहमार्ग पोलिसांच्या वतीने झोपडपट्टी आणि वस्ती परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याचा उद्देश आहे. “- श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे
अहमदनगरला अधिक घटना…
पुणे विभागात सर्वाधिक आत्महत्या अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे झाल्या आहेत. तर पुण्यात घोरपडी, हडपसर, खडकी, पिंपरी-चिंचवड, देहूरोड या रेल्वे स्थानकालगत झोपडपट्टी असल्याने आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यापाठोपाठ सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या बाजूला जगजिवनराज झोपडपट्टी, अंबर तलाव आणि निराळे वस्ती या ठिकाणी आत्महत्या करण्याच प्रमाण जास्त आहे.
कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या बाजूला गीताबाईचा मळा व भिमनगर झोपडपट्टी व बंद केलेल्या रेल्वे गेटच्या रस्त्याजवळ प्रमाण वाढले आहे. मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे, कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या बाजूला टेबलाई झोपडपट्टी तसेच गुडस मार्केटजवळ जास्त आत्महत्या होतात.