लखनौ – समाजवादी पार्टीचे प्रमुख अलिखलेश यादव यांच्या निकटवर्तीय नेत्यांवर तसेच त्यांच्या काही नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, आत्ताशी आयकर विभागवाले आले आहेत.
अजून ईडी आणि सीबीआय येणे बाकी आहे. हे तर होणारच होते. आम्ही आता ईडी आणि सीबीआयची वाट पहात आहोत. हा केवळ इलेक्शन स्टंट आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने केला जात असला तरी आम्ही याच वेगाने प्रचार करणार असून भारतीय जनता पक्षाला राज्यातून घालवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने भाजपला जोरदार आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा राजकीय सूड उगवला जात आहे असा आरोप केला जात आहे. अखिलेश यादव म्हणाले की, भाजपचे लोक कॉंग्रेसच्या वाटेनेच जात आहेत. या आधी कॉंग्रेसची सत्ता असतानाही अशाच पद्धतीने सरकारी यंत्रणेचे दुरुपयोग करून विरोधकांना घाबरवले जात होते असे ते म्हणाले.
आज ज्यांच्यावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले त्यात समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजीव राय, अखिलेश यादव यांचे स्वीय सहायक जितेंद्र यादव यांचा समावेश आहे. या छाप्याबद्ददल बोलताना राजीव राय म्हणाले की, माझ्यावर कोणताही गुन्हा नाही, किंवा कोणताही काळा पैसा मी निर्माण केलेला नाही.
या उलट होताहोईल तो मी गरजूंना मदतच करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे फळ मला अशा पद्धतीने मिळाले आहे. पण आपण या अयोग्य कारवाईच्या विरोधात पूर्ण शक्तिनिशी लढा देणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.