प्राप्तीकर खात्याचे मुंबईत छापे ; 29 कोटी रूपये जप्त

मुंबई : महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यापासून प्राप्तीकर खात्यानं मुंबईत विविध ठिकाणी छापे मारून बेहिशेबी 29 कोटी रूपयांची रोकड जप्त केली. प्राप्तीकर खाते मौल्यवान वस्तू तसेच रोख रकमेची देवाणघेवाण कुठं कुठं होत आहे, याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. यासाठी प्राप्ती कर खात्यानं मुंबईतल्या सर्व 36 विधानसभा मतदार संघामध्ये संवेदनशील स्थानांवर जलद प्रतिसाद पथकांची (क्विक रिस्पॉन्स टिम्स) नियुक्ती केली आहे. आचार संहिता लागू असताना कोणीही रोकड अथवा मौल्यवान वस्तूंचे वितरण करण्यास मनाई आहे.

राज्यात सोमवारी मतदान होणार आहे. तोपर्यंत जलद प्रतिसाद पथके अखंड चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. जर कोणाकडून रोकड वितरणासंबंधी विश्वासार्ह माहिती मिळाली की त्यावर राज्य पोलिसांचे सहकार्य घेऊन कारवाई करण्यात येत आहे. तसेच इतर कायदा अंमलबजावणी संस्थांशीही समन्वय साधून कार्य केले जात आहे, असं प्राप्तीकर खात्याच्या मुंबई विभागानं स्पष्ट केलं.

विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडाव्यात तसेच या काळात पैशाचा गैरवापर होवू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात आचार संहिता लागू झाल्यापासून प्राप्तीकर-1 (अन्वेषण) मुंबईचे मुख्य संचालक यांना राज्यासाठी प्राप्तीकर विभागाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.