आता परीक्षेची घडी समीप

उद्या मतदान : जिल्ह्यातील प्रचाराचा धुरळा बसला खाली

बारामती- विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात उडालेला प्रचाराचा धुरळा अखेर शनिवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजता खाली बसला. आता परीक्षेची म्हणजेच मतदानाची घडी समीप येऊन ठेपली आहे. सोमवारी (दि. 21) मतदान होत असून जिल्ह्यातील 10 पैकी एक दोन मतदारसंघ सोडले तर सर्वत्र जवळपास दुरंगी लढत रंगली असून लढतीत कोणता पक्ष बाजी मारतोय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून बाजी कोण मारणार यासाठी मतदानानंतर दोन दिवसांची म्हणजेच गुरुवार (दि. 24) पर्यंतची वाट पाहवी लागणार आहे..

जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर-हवेली, शिरूर-हवेली, भोर, खेड-आळंदी, जुन्नर, आंबेगाव-शिरूर, मावळ या दहाही विधानसभा मतदारसंघातील प्ररचार आता संपला असून, कार्यकर्ते प्रत्येक मताचा विचार करू लागले आहेत, त्यात शनिवार (दि. 19) आणि रविवार (दि. 20)ची रात्र वैऱ्याची आहे, या भावनेने कार्यकर्ते खबरदारी घेत आहेत. तर प्रशासकीय यंत्रणेकडून मतदानाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीत दहाही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी सहभाग नोंदविला. उमेदवारांकडून भावनिक आवाहन, टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, आश्‍वासनांचा पाऊस मतदारांवर पाडण्यात आला आहे, त्यामुळे दहाही मतदारसंघातील लढतीत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या कालावधीत वैयक्तिक टिकाटिपण्णी झाली. आरोप-प्रत्यारोपही झाले. आता निर्णय मतदारांच्या हाती सोपवून कार्यकर्ते मतदानाची टक्‍केवारी वाढविण्यासाठी कामाला लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.