डोक्‍यात कार्डबोर्ड बॉक्‍स घालून विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

बंगळुरू : परीक्षेच्यावेळी गैरप्रकार रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांकडून वेगवेगळया उपायोजना केल्या जातात. पण कर्नाटकातील हावेरीमधल्या एका कॉलेजने कॉपी रोखण्यासाठी तर हद्दच केली. भगत पीयू कॉलेजने डोक्‍यात कार्डबोर्डचे खोके घालून विद्यार्थ्यांना परीक्षा द्याला लावली. हा प्रकार बुधवार, दि. 16 ऑक्‍टोबर रोजी घडला.

विद्यार्थी डोक्‍यात कार्डबोर्डचे खोके घालून रसायनशास्त्राचा पेपर देत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात धाव घेतली व व्यवस्थापनाला हा प्रकार थांबवण्यास सांगितला. पीयू बोर्डाचे उपसंचालक एससी पीरजादी यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली असून ही अमानवीय कल्पना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी नव्हे तर परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी आम्ही ही उपायोजना केली. हा फक्त एक प्रयोग होता. आम्ही विद्यार्थ्यांना बरोबर चर्चा केली. त्यांची संमती घेतल्यानंतर अंमलबजावणी केली असे कॉलेजचे संचालक एम.बी.सतीश यांनी सांगितले. मला जेव्हा याबद्दल समजले तेव्हा मी लगेच कॉलेजला जाऊन हा प्रकार थांबवायला सांगितला. मी कॉलेजला नोटीसही बजावली आहे असे पीरजादी यांनी सांगितले.

ही पूर्णपणे अमानवीय कल्पना असून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मागच्या महिन्यात मेक्‍सिकोमध्ये असाच प्रकार घडला होता. त्यावर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.