पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाचे उत्पन्न कमी झाले आहे. उत्पन्नवाढीसाठी करसंकलन विभागाने पाऊल उचलले आहे. शहरातील नागरिकांना मिळकतकराच्या संपूर्ण बिलाऐवजी उपलब्ध असलेली रक्कम भरता येणार आहे. या सुविधेमुळे थकीत शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर नागरिकांना भरता येणार आहे. यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने संगणकीय प्रणालीमध्ये बदल केले असून या निर्णयामुळे आर्थिक वर्षांअखेर मिळकत करापोटी मोठा भरणा होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
करसंकलन विभागाच्या वतीने मिळकतकर वसुली मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच दिलेल्या मुदतीमध्ये जे मिळकतकर भरत नाही त्यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात केली आहे.
या आठवड्यामध्ये महापालिकेच्या वतीने सहा मिळकती सील करण्यात आल्या आहेत. कारवाईच्या वेळेत नागरिकांकडे बिलाची पूर्ण रक्कम नसते. अशा वेळी उपलब्ध असलेली रक्कम भरून घेण्याची विनंती केली जाते. नागरिकांच्या अडचणीचा विचार करून कर संकलन विभागाच्या संगणकीय प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे.
त्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना थकीत शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरता येईल. तसेच, थकबाकीची मोठी रक्कम टप्पाटप्प्याने भरता येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मागील वर्षी 4 मार्चअखेर करसंकलन विभागाकडे 440 कोटी रुपयांचा भरणा झाला होता. मात्र, यावर्षी 416 कोटी भरणा झाला. तुलनेने हे उत्पन्न कमी असून चालू आर्थिक वर्षासाठी 31 मार्चपर्यंत 950 कोटी रुपयांचे उद्दिष्ट या विभागाला आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे 26 दिवस बाकी आहेत. या कालावधीत उर्वरित 510 कोटी वसूल करणे महापालिकेला अशक्य आहे. त्यामध्येच निवडणुकीच्या तोंडावर जप्तीची कारवाई देखील थंडावली आहे. त्यामुळे करसंकलन विभाग यावर्षी वसुलीच्या उदिष्टापासून दूर राहणार आहे.