पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पुणे दौऱ्यात महापालिका इमारतीमध्ये येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण इमारतीतील सर्व विभाग शुक्रवारी सील करण्यात येणार आहेत. “स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप'(एसपीजी) अंतर्गत ही कार्यवाही करण्यात येते.
महापालिका इमारत संपूर्णपणे सॅनिटाइज करण्यात येणार आहेच. शिवाय महापालिका इमारतीत गरजेचे जे कर्मचारी, पदाधिकारी येणार आहेत त्यांची आरटी-पीसीआर टेस्टही करण्यात आली आहे. दोन दिवस संपूर्णपणे महापालिका इमारत सील राहणार आहे. तत्पूर्वी, महापालिकेतील सगळी कार्यालये श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच अन्य यंत्रणेच्या सहाय्याने तपासण्यात येणार आहेत. त्यानंतर ते सील करण्यात येणार आहेत.
अशी असते सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी ते जेथे जाणार आहेत, कार्यक्रम घेणार आहेत किंवा भेटी देणार आहेत, तो भाग सात आठ दिवस आधीच “एसपीजी’च्या ताब्यात येतो. त्यावेळी ते त्याची पाहणी करतात. मुळात या दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्था ही चार एजन्सीजमार्फत होत असते. यामध्ये मुख्य एसपीजी असते. त्यानंतर एएसएल, राज्य पोलीस अणि स्थानिक प्रशासन आणि “ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझन टीम’ (एएसएल). ही टीम ही केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असते. केंद्रीय एजन्सीचे अधिकारी “एएसएल’च्या मदतीने पंतप्रधानांच्या भेटीवर लक्ष ठेवतात. कार्यक्रमस्थळाच्या मार्गापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सुरक्षेचे नियम स्थानिक पोलीस ठरवतात. यावर एसपीजीचे अधिकारी लक्ष ठेवतात. मात्र, कार्यक्रम स्थळावर केंद्रीय एजन्सी असलेल्या “एएसएल’ यांच्या मार्फत सुरक्षेच्या दृष्टीने कडक तपासणी केली जाते.