प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -विसर्जनाच्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात किरकोळ वादातून मारहाणीच्या घटना घडल्या. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून लोहियानगर, कासेवाडी, रास्ता पेठ, औंध परिसरात या घटना घडल्या.
साहिल अंबादास भोंगे (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार देवा संजय कांबळे, नजीर वसीम शेख, आसिफ बाबुलल शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ), अदनान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी शेख यला अटक केली आहे. साहिल याची आरोपींबरोबर पाच महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. विसर्जन मिरवणूक पाहून तो घरी जात होता. त्यावेळी आरोपी कांबळे, शेख यांनी त्याला अडवले. आरोपींनी साहिलच्या चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करत आहेत.
लोहियानगर भागात विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना किरकोळ वादातून स्वप्नील सतीश साळुंके (रा. लोहियानगर) याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. याप्रकरणी अंकुश विठ्ठल कांबळे (रा. लोहियानगर) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ तपास करत आहेत.
रास्ता पेठेतील प्रताप मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. राहुल दिगंबर कुंजीर (रा. गणेश पेठ, दूध भट्टीजवळ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. राहुलने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विराज आम्रे, किरण शिवरकर, यश वालिया (रा. रास्ता पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.
ओैंधमधील इंदिरा वसाहतीत विसर्जन मिरवणुकीत धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. बाजीराव विजय मोरे (रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रस्ता, औंध) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मोरे याने याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे आणि त्याचे मित्र वसाहतीतील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी निघाले होते. त्यावेळी धक्का लागल्याने प्रेम वाघमारे, अनिकेत पवार, शुभम गायकवाड, नयन लोंढे, अमित साबळे, आदित्य वाघमारे, मयूर लोंढे, रोहन वाघमारे आणि साथीदारांनी मोरेला बेदम मारहाण केली. दगडफेक करुन परिसरात दहशत माजविली. आरोपी शुभम गायकवाड सराईत असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक महडिक तपास करत आहेत.