प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -आई-वडील, गुरूंचे आशीर्वाद, रसिकांचे प्रेम-साथ लाभल्यानंतर एका कलाकाराला यापेक्षा काय हवे आहे, माझ्या पुढील वाटचालीसाठी ही शिदोरी खूप आहे; मी भाग्यवान आहे, अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या.
माझ्या शिष्यांनी संगीताचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा, ही एकच इच्छा आहे. आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व आले आहे. कलाकाराने या दीपवून टाकणाऱ्या वाटेकडे न जाता त्यांनी साधनेची वाट धरावी आणि स्वत:बरोबरच श्रोत्यांनाही दिव्य आनंदाची अनुभूती द्यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. प्रभा अत्रे यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार आणि त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त रविवारी स्वरावर्तन फाउंडेशनच्या संचालिका, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् यांच्यातर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आला. पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर, हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर मंचावर होते.
पंडित हरिप्रसाद चौरासिया म्हणाले, मी प्रभाजींच्या गायनाचा खूप जुना प्रेमी आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात खूप श्रद्धा आहे.
पं. व्यंकटेशकुमार, एअर मार्शल गोखले, ठाकूर-कुंडलकर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, आनंदी पाटील, बाबासाहेब शिंदे, डॉ. संतोष देशपांडे, डॉ. भरत व्हनकटे, सुधीर गाडे, डॉ. गोविंद कुलकणी उपस्थित होते.