वर्ये येथे कार्यक्रम; शरद पवार व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची प्रमुख उपस्थिती
सातारा – वर्ये, ता. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरचे केंद्राचे उद्घाटन आणि रयत इंग्लिश मीडियम स्कूलचा आप्पासाहेब भाऊराव पाटील नामकरण समारंभ शुक्रवार, दि. 14 रोजी दुपारी 12 वाजता संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटील म्हणाले, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनकडून रयत सायन्स व इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर मंजूर झाले आहे. त्यासाठी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडून अडीच कोटी रुपये अर्थसहाय्य करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेने दीड एकर जागा व दीड कोटी रुपये खर्च करून हे केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या उभारणीत मुंबईतील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्यूकेशनचा सहभाग आहे.
या केंद्रात सायन्स गॅलरी, इनोव्हेशन हब, ऍक्टिव्हिटी सेंटर, इनडोअर, आऊटडोअर एक्झिबिटस्, विविध मॉडेल्स व विज्ञान खेळणी आहेत. जीएसएलव्ही अंतराळयानाची वीस फुटी हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या धर्तीचे हे पश्चिम महाराष्ट्रातील दुसरे विज्ञान केंद्र असून नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर त्याची उभारणी करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांनी स्वतः संशोधन करून उपकरणांची निर्मिती करावी, हा उद्देश आहे.
सातारा शहर परिसरातील पाच हजार विद्यार्थ्यांची केंद्र भेटीसाठी नोंदणी झाली असून पन्नासपेक्षा अधिक शाळा या केंद्राशी जोडल्या जाणार आहेत. हे केंद्र ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे. या प्रकल्पासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन लाभले असून “नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स म्युझियम’ची आर्थिक मदत झाली आहे. रयतच्या माध्यमातून “आयडिया टू पेटंट’ या धर्तीवर या केंद्रात काम केले जाणार आहे.
त्याचबरोबर रयत इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चिरंजीव आप्पासाहेब भाऊराव पाटील यांच्या नावाने केले जाणार आहे. 1960 ते 2007 अशी 47 वर्षे आप्पासाहेबांनी रयत शिक्षण संस्थेची धुरा वाहिली. सायन्स सेंटरचे उद्घाटन व इंग्लिश मीडियम स्कूलच्या नामकरण सोहळ्यास संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. एन. डी. पाटील, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, राजीव गांधी सायन्स कमिशनचे सचिव अनिल मानेकर, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णास्वामी सुब्रमण्यम, नेहरू सायन्स सेंटरचे शिवप्रसाद खेणेद, होमी भाभा सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेंद्र देशमुख, वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुण सप्रे उपस्थित राहणार आहेत. या कार्यकमास उपस्थित राहण्याचे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले आहे.