पुणे – लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. पुणे फेस्टिव्हलला भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती. 35 वर्ष असा कार्यक्रम सुरू ठेवणे कठीण कार्य आहे. पण सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक या महोत्सवात सातत्य ठेवले. महोत्सवातील कार्यक्रम पाहता पुणे संस्कृतीचे माहेरघर असल्याचे स्पष्ट होते, असे मत पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
35 व्या “पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाचा दर्जा आणि कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन पाहता हा महोत्सव 50 वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करून पर्यटन विभागातर्फे महोत्सवाला यापुढेही सहकार्य मिळत राहील, अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, खासदार पद्मश्री हेमा मालिनी, खासदार रजनी पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार नाना पटोले, आमदार रवींद्र धंगेकर, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अभय छाजेड, उल्हास पवार, रमेश बागवे, मीरा कलमाडी आदी उपस्थित होते. पुणे फेस्टिव्हलची देशभरात “मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’ अशी ओळख निर्माण झाली आहे. 1989 पासून हा उत्सव सातत्याने सुरू आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक सुंदर व्हावा यासाठी कलमाडी यांनी खुप कष्ट घेतल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यात येऊन नृत्य सादर करणे ही गौरवाची बाब आहे. या माध्यमातून देशभरातील कलाकारांचा सन्मान होत आहे, अशा भावना अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केल्या. रजनी पाटील, बारणे, आमदार पटोले, डॉ. के.एल. संचेती, उद्योगपती संजय घोडवत यांचे भाषण झाले. कलमाडी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ. के. एच. संचेती यांना जीवन गौरव पुरस्काराने आणि उद्योगपती संजय घोडावत यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शतकपूर्ती वर्ष साजरे करणाऱ्या खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट आणि सदाशिवपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात आला.
हे झाले कार्यक्रम
कार्यक्रमाची सुरुवात 50 कलाकारांनी केलेल्या शंखनादाने झाली. हेमा मालिनी आणि सहकलाकारांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. नंदिनी राव गुजर यांनी तुलसीदास रचित गणेश स्तुती सादर केली. सानिया पाटणकर यांनी “ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी सुखदा खांडकेकर आणि सहकाऱ्यांनी “नृत्य सीता’ हा रामायणातील सीता हरणानंतराचा प्रसंग नृत्य नाटिकेच्या माध्यमातून सादर केला.
नृत्यविष्काराच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे दर्शन घडवण्यात आले. शर्वरी जमेनिस आणि सहकाऱ्यांनी “हिस्टोरीकल एम्पायर्स ऑफ इंडिया’ हा नृत्याविष्कार सादर केला. महाराष्ट्रीयन मंडळ पुणेच्या खेळाडूंनी आर्टिस्टिक योगाच्या माध्यमातून भारतीय योग परंपरेचे अप्रतिम सादरीकरण केले. हेमा मालिनी यांच्या चित्रपट करकीर्दीवर आधारित नृत्य सादरीकरणही करण्यात आले. समारोप लावणी फ्युजनने झाला.