नाराज एकनाथ खडसेंवर आगामी काळात मोठी जबाबदारी येण्याचे दिले संकेत
जामखेड (प्रतिनिधी ) – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला येणार्या निवडणूकीत फक्त चाळीस जागा मिळतील तर भाजप मित्र पक्षांना २४८ जागा मिळणार असल्याचे भाकित जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.तसेच एकनाथ खडसे यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी येणार असल्याचे त्यांनी सांगितले
कर्जत येथे पालकमंत्री राम शिंदे यांचा शुक्रवारी शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी महाजन हे आले होते. या वेळी मोनिकाताई राजळे देखील उपस्थित होत्या. पत्रकारांशी बोलताना महाजन पुढे म्हणाले, भाजप नेते एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज नसुन यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्या वर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही.
भाजपच्या पार्लंमेंटरी बोर्डात उमेदवारीबाबत निर्णय होत असतात. काही कारणामुळे बोर्डाने खडसे यांना उमेदवारी दिली नसेल. खडसे यांच्यावर आणखी काही वेगळी जबाबदारी देण्यात येऊ शकते. पक्षाने त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांचे आता समाधान झाले आहे. पक्षात मानापनाचे नाट्य सुरूच असते. यामुळे पुन्हा पक्षातील सर्व जण एकत्रितपणे काम करतील, असे ते म्हणाले. मावळला राष्ट्रवादीचे नेते पवार यांची पिढी निवडणुकीत उतरली होती. त्यांना तेथे जनतेने उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या नाराजी नाट्याच्या भूमिकेबद्दल काहीतरी वेगळे कारण आहे. लोकसभेला शरद पवार साहेबांना माघार घ्यावी लागली. याचे कारण तिसरी पिढी मागे हटायला तयार नाही, असेही महाजन यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रा राम शिंदे बोलताना म्हणाले की, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वरुण राजाने हजेरी लावली. त्यामुळे काल कर्जत मधील घाण धुऊन गेली अशी टीका पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी रोहित पवार यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावर केली. भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे हे माझे अर्ज भरायला आले आहेत. तसेच बारामतीची शिकार मीच करणार असा टोला रोहीत पवार यांना शिंदे यांनी लावला.