लखनौ, – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील 61 जागांवर हे मतदान झाले. प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा विधानसभा मतदार संघाव्यतिरिक्त अन्यत्र मतदान शांततेत पार पडले.
कुंडा मतदार संघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार गुलशन यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात यादव किरकोळ जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. कुंडा येथील घटनेबद्दल सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
याव्यतिरिक्त कोलोनेलागंज मतदारसंघातील सपाचे उमेदवार, त्यांचे भाऊ आणि अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात एका महिलेला मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अमेठीमध्ये 52 टक्के, अयोध्या- 58 टक्के, बहारीच-54 टक्के, बाराबंकी- 54 टक्के, चित्रकूट- 59 टक्के, गोंडा- 54 टक्के, कुशांबी- 56 टक्के, प्रतापगड- 50 टक्के, प्रयागराज-51 टक्के, रायबरेली- 56 टक्के, श्रावस्थी-57 टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.