अहमदाबाद – भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील ज्येष्ठ खासदार मनसुख वसावा यांनी भाजपचा काल राजीनामा दिला होता. तथापि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता वसावा यांनी आपला निर्णय बदलला असून त्यांनी भाजपमध्येच कायम राहण्याचे मान्य केले आहे.
वसावा हे गुजरातमधील भरूच या आदिवासी भागातून सहा वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी काल पक्ष सोडण्याची घोषणा करीत पक्षाचा राजीनामाही पाठवून दिला होता.आरोग्याच्या कारणासाठी आपण राजीनामा देत आहोत, असेही त्यांनी म्हटले असले तरी भरूचमधील अनेक आदिवासी गावे पर्यावरण संवेदनशील भाग म्हणून जाहीर करण्याच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊ केला होता, असे सांगण्यात येते.
आज सकाळी गांधीनगरमध्ये त्यांनी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वसावा म्हणाले की, मी लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले की माझ्या पाठीच्या दुखण्यावर तसेच नाकाच्या दुखण्यावर मला मोफत आरोग्यसेवा मिळण्यासाठी मी खासदार पद कायम ठेवले पाहिजे.
मी खासदारकीची राजीनामा दिला तर मला मोफत उपचार मिळू शकत नाहीत त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पक्षाने मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून पक्षाचे कार्यकर्ते माझ्या मतदारसंघातील काम सांभाळतील, असे आश्वासन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. मी केवळ प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता पण पक्षाच्या नेत्यांनी समजूत घातल्यानंतर आता मी हा निर्णय मागे घेत आहे, असे ते म्हणाले