क्रिकेटच्या आजवरच्या वाटचालीत अनेक गोष्टी नव्याने दाखल झाल्या. जसे फलंदाजांसाठी कॉपीबुक आदर्श मानले जात होते, त्याला निकालात काढताना टी-20 क्रिकेटमध्ये नवीन फटके दाखल झाले. धावा कशाही आल्या तरी चालतील, पण त्या येणे महत्त्वाचे असते हेच सूत्र टी-20 क्रिकेटमध्ये मानले जाते. फलंदाजीत जे बदल झाले तसेच गोलंदाजीतही काही बदल झाले. यातीलच एक मोठा बदल म्हणजे वाइड यॉर्कर.
हा चेंडू यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्रचंड यशस्वी होताना दिसत आहे. वेगवान किंवा मध्यमगती गोलंदाज याचा खुबीने वापर करताना दिसतात व फलंदाज नैराश्यामुळे या चेंडूवर बाद होतानाही दिसत आहेत. यॉर्कर म्हणजे खरेतर फलंदाजाच्या दोन पायांच्या मध्ये टाकलेला चेंडू असे ढोबळ मानाने म्हणता येईल. पाकिस्तानी गोलंदाज ज्यांना इंग्रजी येत नाही ते फलंदाजाच्या बुंध्यात चेंडू टाकणे म्हणजे यॉर्कर चेंडू असे म्हणतात.
यंदाच्या स्पर्धेत मात्र वाइड यॉर्कर हा नवा चेंडू शोधला गेला. समोरचा फलंदाज कोणताही असो त्याला सातत्याने बाहेरचे चेंडू खेळण्यासाठी उद्युक्त करायचे व त्यातच एक चेंडू जरा जास्त बाहेर टाकायचा. त्याला हा चेंडू वाइड ठरेल असे वाटले तर तो सोडून देईल. मात्र, सातत्याने असे चेंडू टाकत राहिले तर कंटाळून अखेरीस तो या चेंडूला बॅट लावेल व यष्टीरक्षक किंवा स्लीपला झेलबाद होईल. यंदाच्या स्पर्धेत हेच वाइड यॉर्कर अस्त्र बनल्याचे दिसत आहे.
असा सापळा यंदाच्या स्पर्धेत जवळपास प्रत्येक कर्णधाराने आपल्या गोलंदाजांच्या मदतीने रचलेला पाहायला मिळाला व त्यावर आयपीएलमध्ये दादा समजले जात असलेले दिग्गज फलंदाजही बाद होताना दिसत आहेत. टी-20 सामन्यात पहिली सहा षटके पॉवरप्लेची असतात व त्यावेळी बाहेरच्या वर्तुळात मर्यादित क्षेत्ररक्षक ठेवावे लागतात, त्यामुळे फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करत मोठे फटके मारणे सोपे ठरते. तसेच सामन्यातील अखेरची पाच षटके डेथ ओव्हर्स मानली जातात व या षटकांतही फलंदाज वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न करत असतात.
या दोन्ही भागात यंदाच्या स्पर्धेत अनेक गोलंदाज वाइड यॉर्कर चेडूचा मारा करताना दिसत आहेत. त्यामुळे एकतर फलंदाजाला मोठे फटके मारता येत नाहीत किंवा त्यावर बंधन येते. किंबहुना अशा बाहेरच्या चेंडूला बॅट लावून एकतर फलंदाज बाद होतात किंवा त्यांना चौकार किंवा षटकारही मारता येत नाहीत, परिणामी धावांवर अंकुश राखता येतो. काही वर्षांपूर्वी वेगवान गोलंदाजाला यॉर्कर चेंडू टाकता येतो का किंवा हा चेंडू कोणता गोलंदाज जास्त भेदक पद्धतीने टाकतो हे पाहिले जात होते. यंदाच्या मोसमात मात्र मूळ यॉर्करपेक्षा असे वाइड यॉर्कर टाकणारे गोलंदाज हीच कर्णधाराची पहिली पसंती बनलेली दिसते.