देशी सफरचंदाची आवक वाढल्याने दरात घसरण
पिंपरी – “रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर रहा’ ही म्हण खूप प्रचलित असली तरीही सफरचंदाचे दर सर्वसामान्यांना सफरचंदापासूनच दूर ठेवतात. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये देशी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सफरचंदाच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. यामुळे सफरचंद बऱ्याच वर्षांनंतर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशामध्ये सफरंचदाचा हंगाम सुरु झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातही देशी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आवक वाढल्यामुळे महागडे फळ म्हणून ओळख असणाऱ्या सफरचंदाचे दर 80 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. सफरचंदाचे दर गेल्या काही वर्षांमध्ये शंभरच्या खाली उतरले नव्हते. परंतु हिमाचल प्रदेशातील देशी सफरचंदांची मोठी आवक झाल्याने पिंपरी बाजारात 80 ते 120 रुपये प्रति किलो दराने सफरचंदांची विक्री होत आहे. दरवर्षी, हिमाचल प्रदेशामधील सफरचंदाचा हंगाम पावसाळ्यात सुरु होतो. हा हंगाम सुरु झाल्यानंतर हिमाचल प्रदेशामधील सफररचंद गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यात विक्रीसाठी दाखल होत आहेत. ही सफरचंदे दिसायला आकर्षक नसली तरी गोड आणि चविष्ट असणारी सफरचंद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहेत.
हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या रिचर्ड, रॉयल, रेड गोल्ड यासारख्या प्रजातीच्या सफरचंदाला मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या शिवाय यावर्षी हिमाचल प्रदेशामध्ये पोषक हवामानामुळे सफरचंदाचे उत्पादनही जास्त झाले आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसात सफरचंदाच्या भावामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
विदेशी सफरचंदाच्या तुलनेत दर निम्मे
पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील बाजारात वॉशिंग्टन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका येथील सफरचंदे विक्रीसाठी येतात. ही सफरचंदे शीतगृहात ठेवण्यात येतात. त्यामुळे, अशा विदेशी सफरचंदाची वर्षभर विक्री होत असते. विदेशी सफरचंद देशी सफरचंदांच्या तुलनेत दिसायला खूपच आकर्षक असतात. परंतु चवीला देशी सफरचंदे सरस असतात. देशी सफरचंदाचा हंगाम आल्यानंतर मात्र, त्यांना शीतगृहात न ठेवता त्यांची विक्री होत असते. शिवाय देशी सफरचंदाचा भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने ताजी सफरचंद ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मिळतात. सध्या देशी सफरचंदे विदेशी सफरचंदाच्या तुलनेत निम्म्या दराने उपलब्ध आहेत.