लोणी काळभोर येथील प्रकार : विवाहित तरूणांकडून छळ, मारहाण
लोणी काळभोर – फेसबुकवरून मैत्री करून, पहिले लग्न लपवून ठेवून मैत्रीणीशी दुसरे लग्न करून घरी गेल्यानंतर तुला व्यवस्थित स्वयंपाक येत नाही. घरखर्चासाठी माहेरुन 50 हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास देवून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पतीविरुध्द पत्नीने फिर्याद दिली आहे.
सचिन बाळू कांबळे (रा. लोणी काळभोर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुलै 2018 मध्ये पीडित महिला व सचिन यांची फेसबुकवरून मैत्री झाली होती. एकमेकांना मोबाइल नंबर दिल्याने ते एकमेकांशी संपर्क साधून गप्पा मारत होते. त्यांची समोरासमोर भेट झाली. त्याने वारंवार लग्न करू असा तगादा लावला होता. तुला नोकरी लावतो, असे तो तिला सांगत होता.
दि. 30 जुलै रोजी त्याने तिला एका कंपनीत मुलाखतीसाठी जायचे आहे म्हणून बोलावून घेतले. तिला आळंदी देवाची येथे नेले. तेथे आपण आजच लग्न करू, असे म्हणाला. तिने लग्नास होकार दिला.
आळंदी येथील एका मंगल कार्यालयात त्यांनी विवाह केला. त्यानंतर ते फुरसुंगी येथे आले. त्याने तिच्याकडील मोबाइल काढून घेतला होता. जानेवारीत ते लोणी काळभोर येथील सोसायटीत राहण्यासाठी आले. त्यावेळी तेथे सचिन याचे आई, वडील व एक महिला होते. तिच्याबद्दल विचारले असता त्याने ती माझी पत्नी असल्याचे सांगितले. ही बाब लपवली का, अशी विचारणा केली असता त्याने तिला दमदाटी करून ही बाब कोणासही सांगू नकोस अन्यथा जिवे मारीन अशी धमकी दिली. दि. 29 जुलै रोजी तिचे आई, वडील तिला शोधत लोणी काळभोर येथे पोहोचले. त्यावेळी त्यांना तिने हा प्रकार सांगितला.