चौथ्या टप्प्यात 109 उमेदवार कोट्यधीश 

89 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

मुंबई – महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचा शेवटच्या टप्प्यात धनाढ्य उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या टप्प्यातील 17 लोकसभा मतदारसंघात 323 उमेदवार रिंगणात उतरले असून यापैकी 109 उमेदवार कोट्यधीश आहेत. यामध्ये भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा समावेश असून ते कोट्यधीच्या संपत्तीचे धनी ठरले आहेत. या 17 मतदारसंघात 89 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या 29 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर “महाराष्ट्र इलेक्‍शन वॉच’ आणि “असोसिएशन फॉर डेमोक्रटीक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने उमेदवारांच्या आर्थिक, शैक्षणिक तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे त्यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे विश्‍लेषण केले आहे. संस्थेच्या माहितीनुसार निवडणूक लढवत असलेले 34 टक्के उमेदवार हे आर्थिकदृष्ट्‌या गब्बर आहेत. दलित, मागासवर्गीयांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी सहा उमेदवार कोट्यधीश आहेत.

निवडणूक लढवत असलेल्या 323 पैकी 89 उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हेगारीची प्रकरणे दाखल असल्याचे घोषित केले आहे. यापैकी 64 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. दोन उमेदवारांच्या विरोधात गुन्हे सिध्द झाले असून वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमदेवार पवन पवार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तीन उमेदवार असे आहेत की ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. तसेच दहा उमेदवारांनी आपल्या विरोधात महिला अत्याचाराशी, तर दोन उमेदवारांनी त्यांच्यावर अपहरणाशी संबंधित गुन्हा दाखल असल्याचे जाहीर केले आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे पकरण दाखल असलेल्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 17 पैकी 7, बहुजन समाज पक्षाच्या 15 पैकी 4, कॉंग्रेसच्या 9 पैकी 4, भाजपच्या 7 पैकी 4, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 7 पैकी 5 उमेदवारांचा समावेश आहे.

टॉपटेन श्रीमंत उमदेवार

उमेदवार जाहीर केलेली संपत्ती 
संजय सुशील भोसले (वंचित बहुजन आघाडी) 125 कोटी 6 लाख 
श्रीरंग बारणे (शिवसेना) 12 कोटी 33 लाख 
प्रिया दत्त (कॉंग्रेस) 96 कोटी 2 लाख 
मिलिंद देवरा (कॉंग्रेस) 79 कोटी 32 लाख 
उर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस) 68 कोटी 9 लाख 
समीर भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 65 कोटी 46 लाख 
सुभाष पासी (समाजवादी पक्ष) 64 कोटी 2 लाख 
इंजिनिअर नवीन बेताब (अपक्ष) 51 कोटी 2 लाख 
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) 42 कोटी 18 लाख 
कुणाल पाटील (कॉंग्रेस) 42 कोटी 9 लाख 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.