स्मार्ट सिटी तयार करणार कचऱ्याची कुंडली

निर्मितीपासून ते प्रक्रियेपर्यंत कचऱ्याचा प्रवास एका क्‍लिकवर कळणार

– सुनील राऊत

पुणे – शहरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक घरातील कचऱ्याचा निर्मितीपासून ते प्रक्रिया करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची माहिती आता एका क्‍लिकवर मिळणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीने पुढाकर घेतला असून औंध आणि बाणेर परिसरात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी जीआयएस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात औंध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असून त्यासाठी सुमारे 3 कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. त्यानंतर हा प्रकल्प स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या माध्यमातून पॅन सिटी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पास “शून्य कचरा प्रकल्प’ असे नाव देण्यात आले आहे.

असा आहे प्रकल्प प्रत्येक मिळकतीचा कचरा निश्‍चित होणार
या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात या दोन्ही प्रभागांतील घरांचे जीआयएस मॅपिंग करून त्याचा नकाशा करण्यात आला आहे. त्यात निवासी घरे, मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल, शाळा, हॉटेल तसेच इतर व्यावसायिक आस्थपानांनुसार, हे मॅपिंग करण्यात आले आहे. त्यानंतर आता या मिळकतीमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या नोंदी घेतल्या जात आहेत. त्यात, संबंधित मिळकतीत कोणत्या स्वरूपाचा कचरा निर्माण होतो, ओला कचरा, सुका कचरा, त्यातील किती कचऱ्याचे वर्गीकरण होते. निर्माण होणाऱ्या किती कचरा संबंधित मिळकतधारक “रिसायकल’ करतात, हा कचरा कोणाला दिला जातो, याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रभागांमध्ये नेमका किती कचरा निर्माण होतो. किती मिळकती वर्गीकरण करतात, किती मिळकती प्रक्रिया करतात ही सर्व माहिती एका क्‍लिकवर दररोज मिळणार आहे.

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात संकलन यंत्रणा तसेच प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे. या मिळकतींचा कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बीट ठरवले जाणार आहे. हे कर्मचारी दररोज कोणत्या मिळकतींचा किती कचरा घेऊन आले याच्या नोंदी ऑनलाइन ठेवल्या जातील. त्यानंतर या कचऱ्याचे वर्गीकरण करून किती कचरा प्रक्रियेसाठी गेला तसेच किती पुनर्चक्रीकरणासाठी गेला याच्या नोंदी ठेवल्या जाणार आहे. स्वच्छ संस्था आणि सीईई या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात असून त्यासाठी स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कचरा निर्मितीपासून त्याची प्रक्रिया करून विल्हेवाट लावेपर्यंतची सर्व माहिती एका क्‍लिकवर पाहता येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.